नंदुरबार : नाल्याच्या पाण्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. पोळ्याच्या (Bail Pola 2024) पूर्वसंध्येलाच शेतकरी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील रनाळा (Ranala) येथे घडली. यातील मृत ज्ञानेश्वर धात्रक (Dhaneshwar Dhatrak) याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. त्याची लग्नाची तारीख ही ठरली होती. दरम्यान या तरुण भावंडांच्या मृत्यू झाला त्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर वडील काम करत होते. रात्री उशिराने दोघा भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


नंदुरबारच्या रनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी दगा धात्रक यांची परिस्थितीत सर्वसामान्य आहे. गरिबीतून आता कुठे चांगले दिवस यायला सुरुवात झाली होती. त्यांचे दोघे मुले म्हशी चारुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होते. रविवारी दोघे जण नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. 


दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत


दगा धात्रक यांच्या रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा बंधारा आहे. त्यालगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या. बराच वेळ उलटूनदेखील काही केल्या म्हशी बाहेर येईना. यामुळे विकी दगा धात्रक (Vicky Dhatrak) (22) हा म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याचे त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर दगा धात्रक (25) याच्या लक्षात आले. तो भावाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दोघे जण पाण्यात बुडाले.


पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटूंबावर दु:खाचा डोंगर


ही बाब काठावर बसलेल्या तिघा लहान मुलींच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच लगतच्या शेतातील शेतकरी व मजुरांना समजल्यावर मदतीसाठी धावपळ झाली. परंतु, तोपर्यंत दोघे जण पाण्यात बुडाले होते. यामुळे परिसरातील काहींनी पाण्यात उड्या घेत त्यांचा शोध घेतला. दोघा भावांचा मृतदेह पाहून कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात  दोघांचे शव विच्छेदन करण्यात आले. रात्री उशिराने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू


Bhandardara Dam : भंडारदरा धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू