Nandurbar News : मागील वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळं पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वेाच्च प्राधान्य देण्यात यावे. तसेच टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Vijaykumar Gavit) यांनी दिल्या आहेत. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई संदर्भात आयोजित आढावा मंत्री गावित बोलत होते. 


नंदुरबार जिल्ह्यात जून ते जुलै  या काळात 76.09 टक्के पाऊस


सर्वसाधारणपणे नंदुरबार जिल्ह्यात जून ते जुलै या कालावधीत गतवर्षी 85.4 टक्के पाऊस झाला होता, चालू वर्षी तो 76.09 टक्के इतका झाला आहे. तालुकानिहाय नंदुरबार (50 टक्के), नवापूर (75.07 टक्के ),शहादा (60.03 टक्के), तळोदा (110.03 टक्के), अक्राणी (109.02 टक्के ),अक्कलकुवा (98.06 टक्के ) इतका पाऊस झाला आहे. येणाऱ्या काळात काही तालुके आणि गावांमध्ये पाऊस न पडल्यास टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळं रोजगार हमीतून कामे, मुबलक चारा, तसेच प्रत्येक शेतकरी, वनपट्टेधारक हा विमाधारक कसा होईल यासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मंत्री गावित यांनी दिल्या आहेत. 


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा


तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्य आणि कापूस, ऊस यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असेही गावित म्हणाले. बियाणे व खत दुकानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडचण करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. प्रसंगी परवाना रद्द करण्यात यावा. जून महिन्यात वादळी वारा, अवकाळी पावसामुळे ज्या कोरडवाहू, बागायती, बहुवार्षिक पिकांचे, घरांचे नुकसान झाले आहे, त्या 884 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत शासकीय मदत मिळेल यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. पिकविमाची मुदत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. वनपट्टेधारकांना ऑफलाईन विमा काढण्यास अनुमती देण्यात आली असून त्याबातही वनपट्टेधारकांना जागृत करावे, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.


अमृतमहोत्सवी वर्षात 100 टक्के घरकुलांचे स्वप्न साकार करण्याचा मानस


नंदुरबार जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत एकही व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 100 टक्के घरकुलांचे स्वप्न साकार करण्याचा मानसही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेत अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावनकुमार अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे,सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तसेच सर्व तालक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांनी सहभाग घेतला.