नंदुरबार : शहादा शहरातील बायपास रस्त्यावर ट्रव्हल्स आणि आयशरचा भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातात तीन जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहादा शहरातील बायपास रस्त्यावरील नवीन बस स्थानक जवळ ट्रव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक झाली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रव्हल्स मधील प्रवासी मजुरीसाठी गुजरातकडे जात होते. तर आयशरमधील मजूर ऊसतोडीसाठी सांगलीकडे जात होते. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात स्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, अपघातग्रस्त वाहने वाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
घटनेची माहीती मिळताच शहादा पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक देखील पोलिसांना मदत करत आहेत.
दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी देखील याच शहरात झालेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शहादा- प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावानजीक शहादाकडे जात असलेल्या बैलगाडीस्वाराला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली होती. यात बैलगाडीस्वार शेतकरी जागीच ठार झाला होता. या अपघातात एक बैल देखील ठार झाला होता.
महत्वाच्या बातम्या