नंदुरबार : बदलापूरमधील शाळेत (Badlapur School Case) दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. यानंतर नंदुरबारमध्येही (Nandurbar) असाच धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. नंदुरबारमधील एका नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सफाई कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर शाळेनेही कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला बडतर्फ केले आहे. यानंतर आता नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. 


नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप दाखवण्याची घटना समोर आल्यानंतर नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने सुरक्षित शाळा (School) अभियान सुरू करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी स्वतः शाळामध्ये जाऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी करणार आहेत. तसेच विद्यार्थिनींसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.


स्वतः पोलीस अधीक्षक देणार शाळांना भेटी


नंदुरबारमधील संतापजनक प्रकारानंतर पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. यानंतर नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांनी सुरक्षित शाळा अभियान सुरू केलं आहे. यात स्वतः पोलीस अधीक्षक शाळांना भेटी देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय योजना आहेत याचा आढावा घेणार आहेत. त्याच सोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी नियमित शाळांना भेटी देणार आहेत. त्याचसोबत विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत.


काय आहे सुरक्षित शाळा अभियान?



  • शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यांच्या बॅकअपच्या नियमित निरीक्षणासाठी शाळा प्रशासनाने समिती बनवावी. समितीला काही घटना संशयास्पद वाटल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.

  • शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची पडताळणी करून त्याची माहिती द्यावी. 

  • शाळेची बस तसेच विद्यार्थ्यांचा वाहतूक करणाऱ्या वाहनांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती ठेवणे.

  • वरिष्ठ पोलीस अधिकारी शाळांमध्ये असलेल्या सुरक्षितता उपाययोजनांची अचानक पाहणी करतील.

  • स्वतः पोलीस अधीक्षक शाळांना भेट देणार आहेत. ते विद्यार्थ्यांसोबत मुक्तसंवाद साधून समस्या जाणून घेतील. 

  • बिट मार्शल आणि दामिनी पथकाचे कर्मचारी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस शाळेबाहेर पेट्रोलिंग करणार आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Alibag : अलिबागमध्ये शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा संताप, पोलिसात गुन्हे दाखल


Palghar Crime : आई-मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये कुजलेला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय; नेहरोलीमधील धक्कादायक घटना