Nandurbar Gram Panchayat Election : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात 206 ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. धडगाव (25), अक्कलकुवा (45), तळोदा (55) आणि नवापूर (81) या तालुक्यातील 206 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. सर्वाधिक ग्रामपंचायत या नवापूर तालुक्यातील आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्ती करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पितृपक्ष सुरु असल्याने उमेदवार शेवटच्या दिवशी अर्थात 27 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्राधान्य देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 14 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे.
नवापूरमध्ये मध्यरात्रीपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी
नवापूर तालुक्यातील 81 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबरपासून सुरु झाली. सहा दिवसांची मुदत शिल्लक आहे. 27 सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करु शकतात. यासाठी नवापूर शहरातील सेतू केंद्रांवर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हे काम सुरु असल्याचे पाहायला मिळालं. या दरम्यान महिला उमेदवारांना देखील मध्यरात्रीपर्यंत ताटकळत उभे राहावं लागलं. वेबसाईट धीम्या गतीने सुरु आहे. इंटरनेट स्लो असल्यामुळे एका उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी किमान अर्धा ते एक तास लागत आहे. सर्व इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरले जातील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.
नवापूरमध्ये 81 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
नवापूर तालुक्यातील 114 ग्रामपंचायत पैकी 81 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुका आहेत. यात एकूण 259 प्रभागांकरिता 709 सदस्य आणि 81 सरपंच यांच्या निवडीकरता निवडणूक पार पाडली जाणार आहे. एकूण 1 लाख 29 हजार 096 पैकी 66 हजार 607 स्त्री मतदार तर 62 हजार 489 पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. या निवडणुकीसाठी विविध विभागातील वरिष्ठ सहायक दर्जाचे 41 निवडणूक निर्णय अधिकारी आणि तितकेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. सर्व कामकाज तहसील कार्यालयातून चालेल. नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी आणि सुरेखा जगताप कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी लक्ष ठेवून आहेत.
अशी आहे प्रक्रिया
सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून तहसीलदार तथा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल
एकूण जागा 149
भाजपा 83
शिवसेना शिंदे गट 29
काँग्रेस 29
राष्ट्रवादी काँग्रेस 05
स्थानिक विकास आघाडी 03