Nandurbar News : नंदुरबार बाजार समिती (Nandurbar Market committee) दोन दिवस बंद राहणार आहे. कारण बाजार समितीत शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माल ठेवण्यासाठी शेडमध्ये जागा नसल्याने आणि जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहण्याचा अंदाज असल्यामुळे खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. अवकाळी पावसामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाचं नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेत बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.
नंदुरबार बाजार समितीत कडधान्याची आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शेतीमालाची आवक वाढल्यामुळे माल ठेवण्यासाठी शेडमध्ये जागा नाही. तसेच काल (15 मार्च) झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत आणलेला शेतकऱ्यांचा शेतीमाल भिजल्याने नुकसान झालं आहे. अशातच जिल्ह्यात येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पाऊस बरसत आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. अशातच आता पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: