Nandurbar Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीव विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. तर दुसरीकडं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar Rain) जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळील पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळं 10 गावाचा संपर्क तुटला आहे.
नागरिकांसह विद्यार्थ्यांना करावा लागतोय समस्यांचा सामना
नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळं पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी नागन नदीला आलेल्या पुरात हा पर्यायी पूल वाहून गेला होता. त्यानंतर संपर्क तुटलेल्या दहा गावांचा संपर्क करण्यासाठी पुन्हा पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र काल (27 जुलै) नागन नदीच्या पाणी पातळीत पुन्हा अचानक वाढ झाल्यानं नवीन बनवण्यात आलेला पूलही वाहून गेला आहे. त्यामुळं परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पूर्ण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, नागरिकांची मागणी
सध्या विद्यार्थी आणि नागरिक धोकेदायक परिस्थितीत नदीच्या पाण्यातून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. अपूर्ण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, तोपर्यंत परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी पूल पुन्हा बनवण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मुसळधार पावसामुळं नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहेत.
मराठवाड्यासह विदर्भात मोठं नुकसान
दरम्यान, या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्यातील विविध जिल्ह्यांना बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथे नदी नाल्यांना पूर आले आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना देखील अनेक ठिकाणी या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं राज्यातील आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: