Nandurbar Road : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकार्पण केलेल्या सेंधवा-विसरवाडी राष्ट्रीय महामार्गाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील कोळदा- खेतीया रस्त्याला देखील मोठं तडे पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळं हे तड गेले आहेत. अशा रस्त्यांमुळं वाहन धारकांना वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापुर्वीच धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे लोकार्पण केले होतं. मात्र तब्बल तीस वर्षे मुदत असलेल्या या रस्त्याला काही महिन्यातच भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणचे सिमेंटचे काँक्रीटीकरण देखील निघत आहे. त्यामुळं रस्त्याचा गुणवत्ता प्रश्न निर्माण झाला आहे. 440 कोटींचे काम कमी दरात निविदा भरत संबंधित ठेकेदाराने घेतले होते.  या कामाच्या गुणवत्ते संदर्भात तक्रारी असून अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.


उद्घाटनाच्यानंतर काही दिवसातच रस्त्याला 5 ते 50 मिटर भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी काँक्रीट निघून मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी लोखंडाचे रॉड बाहेर आले आहेत. तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सदोष जागेवर पाणी साचून आपघात होत आहेत. संबधित कामाची केंद्र शासनाच्या वतीने गुणवत्ता का तपासली गेली नाही. या शिवाय अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उन्हाळ्यात या भेगामध्ये ठेकेदाराने डांबर भरून उद्घाटनाची वेळ मारुन नेली होती. मात्र, आता या भेगा मोठ्या होत असून सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.




या महामार्गावर टोल बसवला जाणार, मात्र, गुणवत्तेचे काय? 


या नियोजित महामार्गासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराने 26 टक्के कमी दराच्या निविदा भरत हे काम 300 कोटी रुपयांना घेतले होते. काम करत असताना कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलं आहे. संबधित ठेकेदार आणि मंत्र्याने 30 वर्ष रस्त्याला काही होणार नाही असा दावा केला होता. मात्र, काही दिवसातच रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. या महामार्गावर टोल बसवला जाणार आहे. मात्र, गुणवत्तेचे काय? असा प्रश्न शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाच्या गुणवत्ते संदर्भात नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गाविता यांनी या निकृष्ठ दर्जाच्या कामांबद्दल मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे. तरी या कामाची चौकशी होत नसल्याने ठेकेदाराला अभय कोणाचे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.