Gram Panchayat Election 2022: राज्यभरात उद्या (18 डिसेंबर रोजी) ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आहे. यातच नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापैकी 06 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असून उर्वरित 117 ग्रामपंचायतिसाठी निवडणूक मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. अशातच मतदानाची वेळ ही सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत असताना नंदुरबार जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया ही दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. 


नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 04 आणि अक्राणी तालुक्यात 04 ग्रामपंचायती या अतिदुर्गम भागांत समावेश होतो. यामुळे 08 ही ग्रामपंचायती मध्ये सकाळी सात ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या आठ ग्रामपंचायती या अतिदुर्गम भागात वसलेल्या असल्याने याठिकाणी पोहचण्यासाठी मतदान यंत्रणेला अनेक किलो मीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे परताना रात्रीच्या अंधारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ग्रामपंचायतींच्या मतदानाची वेळी ही फक्त साडेतीन वाजेपर्यत असणार आहे.  


दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील मणीबेली, डनेल, जांगठी,धनखेडी तर अक्राणी तालुक्यातील उडद्या , भादरी, भादल, भमाणे अशा या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची वेळ ही दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. यासाठी प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नियोजन केले असून आज दुपारीच ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्रावर कर्मचारी अधिकारी पोहचले आहेत. 


जिल्ह्यातील तालुका निहाय ग्रामपंचायत निवडणुका


नंदुरबार 18, अक्कलकुवा 31, धडगाव 47, तळोदा 01, शहादा 10, नवापूर 16 अशा पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक आहेत. यापैकी 84 ग्रामपंचायती  मोठ्या ग्रामपंचायतचे विभाजन करून तयार झाल्या आहेत या ग्रामपंचायती साठी पहिल्यांदाच निवडणूक होत असून सत्ता कोणाची राहील हे निकालानंतर समजेल. 


कुणाची प्रतिष्ठा पणाला?


धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विद्यमान आमदार के सी पाडवी आणि विधान परिषदेचे ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचे प्रतिष्ठा पणाला लागले आहे. शहादा तालुक्यात माजी मंत्री पद्माकर वळवी आणि भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांची प्रतिष्ठापनाला आहे. नंदुरबार तालुक्यात विद्यमान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. नवापूर तालुक्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची प्रतिष्ठापनाला आहे.