Nandurbar News : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याचे समोर आलं आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सेंधवा विसरवाडी राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटीकरणचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर गेल्या आठ महिन्यात झालेल्या विविध अपघातात 18 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. याबाबत वारंवार निवेदन देऊनही त्याकडं दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांनी भर पावसात आज आंदोलन केलं.


अधिकाऱ्यांनी दिलं रस्ता दुरुस्तीचे आश्वासन


स्थानिक नागरिकांनी आणि वानधारकांनी वारंवार रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित ठेकेदारांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं तसेच गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळं अनेक अपघात होत आहेत. नागरिकांनी निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्यानं आज गोमाई नदी पुलावर शहादा तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते आणि प्रकाशा परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. भर पावसात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनाच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.




पावसामुळं शेतीचंही मोठं नुकसान


दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून नंदूरबार जिल्ह्यात चांगलाच पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि रस्त्यांसह पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांना बसला होता. देव नदीला आलेल्या पुरात वडफळी येथील शासकीय आश्रम शाळेत पुराचे पाणी देखील शिरले होते. माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के सी पाडवी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. त्यासोबतच नर्मदा काठावर अतिवृष्टीमुळं झालेल्या रस्ते आणि पुलांच्या नुकसानीच्या दुरुस्तीच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. त्यासोबत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता नुकसानीचे पंचनामे करुन दिलासा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.


महत्त्वाच्या बातम्या: