Tomato Price Hike : एकीकडे पावसाने पाठ फिरवली असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. तर राज्यात अनेक ठिकाणी टोमॅटोचे (Tomato) दर 150 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने हे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे नांदेड (Nanded) जिल्ह्यात तर टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशासह बंगळुरूहून टोमॅटोची आवक केली जात आहे. तर टोमॅटो खरेदी करण्यासाठी शहरातील अनेक भागात गर्दी पाहायला मिळत आहे.
वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता भाज्यांचे दर गगनाला पोहोचले असून, महागाईचा चटका जाणवत आहे. अशातच टोमॅटोच्या दराने कहर केला असून, टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली आहे. नांदेड जिल्ह्यात तर पैसे मोजून देखील टोमॅटो मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण नांदेड शहरातील नागरिकांना आंध्र प्रदेशातील 830 किलोमीटर अंतरावरील मदनपट्टी येथून टोमॅटो येत आहे. आशा परिस्थितीत ग्राहकांनाही या टोमॅटोची भुरळ पडली असून खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
खरीप हंगाम सुरू झाला असून, शेती मशागतीची कामे आटोपून शेतकऱ्यांनी शेत रिकामे केले आहेत. त्यामुळे शेतात असलेला भाजीपाला पीकेदेखील नष्ट झाली. अशात बाजारात टोमॅटोची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. पण आता राज्यातच टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. त्यामुळे ठोक बाजारात 100 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 120 ते 140 रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. आणखी एक महिना हीच स्थिती रहील, असे व्यापारी सांगत आहेत.
आंध्र प्रदेशासह बंगळुरूहूनही आले टोमॅटोची आवक
यंदा पाऊस लांबल्याने टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. तसेच दरम्यानच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला लावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यापूर्वी दहा रुपये किलोने विकणारे टोमॅटो सध्या सर्वाधिक ठोक बाजारात 100 ते 120 रुपये किलोने विकले जात आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, आंध्रप्रदेशातील मदनपट्टीव बंगळुरू येथूनही टोमॅटो येत आहेत. त्यामुळे नांदेड शहरात देखील असाच बाहेरून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे टोमॅटो घेण्यासाठी गर्दी होत आहे. त्यात अधिकचे पैसे देखील मोजावे लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: