Sambhaji Bhide in Nanded : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide) आज आणि उद्या दोन दिवसीय नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान हदगाव, भोकर, नायगाव व नांदेड येथे त्यांच्या जाहीरसभा व बैठका होणार आहेत. त्यामुळे या सर्व सभांना शिवभक्त बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मात्र संभाजी भिडेंच्या नांदेड दौऱ्याला विरोध करण्यात येत आहे. तसेच संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. 


संभाजी भिडेंच्या आज आणि उद्या होणाऱ्या नांदेड दौऱ्याला मोठा विरोध होत आहे. याबाबत भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवदेन देण्यात आले आहेत. 'देशद्रोही वक्तव्य करून धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांची जाहीर सभा भोकरमध्ये 13 रोजी होत आहे. त्यामुळे भिडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


सभा उधळून लावण्याचा इशारा...


वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे संभाजी भिडे यांची सभा नांदेडमध्ये 14 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे ही सभा रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संभाजी भिडे यांच्याविरुध्द भीमा कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करुन वाद निर्माण करतात. त्यांची सभा नांदेडमध्ये ठेवून काही जण जातीय तेढ निर्माण करु पाहत आहेत. पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमावर बंदी टाकावी. अन्यथा आम्ही ही सभा उधळून लावू. असे निवदेनात म्हटले आहे. 


असा असणारा भिडेंचा नांदेड दौरा... 


भिडे गुरुजी यांची आज (13 जुलै) रोजी दुपारी 2 वाजता हदगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेस उमरखेड, माहूर व किनवट या ठिकाणचे शिवभक्त तरुण कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता भोकर येथे जाहीर सभा होणार आहे. तसेच उद्या (14 जुलै) रोजी दुपारी 2 वाजता अंबिका मंगल कार्यालय नायगाव येथे भिडे गुरुजींची सभा व बैठक होणार आहे. या ठिकाणी नायगाव, देगलूर, मुखेड, बिलोली आणि धर्माबाद शिवभक्त बंधु भगिनी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तर सायंकाळी 5  वाजता नांदेड येथे जाहीर सभा होणार आहे. तर या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Asaduddin Owaisi : अटक वॉरंट जारी केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी नांदेडच्या न्यायालयात हजर; पाहा काय आहे प्रकरण?