नांदेड : मागील काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) सतत गावठी कट्ट्याच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यातच आता नांदेड (Nanded) जिल्ह्यात चक्क पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली गावठी कट्टे विक्री केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, नांदेड शहरात गावठी कट्टे सहजपणे मिळत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या ताब्यातून शिवाजीनगर पोलीसांनी दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
गणेशोत्सव सुरु असल्याने शिवाजीनगर पोलिसांचे पथकाकडून आपल्या हद्दीत 24 तास गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे हे आपल्या पथकासह पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक व्यक्ती गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सोनकांबळे यांना मिळाली. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला. यावेळी एक संशयित व्यक्ती पोलिसांना दिसून आला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव संजय परिहार असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस मिळून आले आहे.
नांदेडमध्ये राहणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील एका युवकाला नांदेडच्या शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली असून, पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. संजय परिहार असे त्याचं नाव असून, तो मध्यप्रदेश राज्यातील बिल्हेटी येथील रहिवासी आहे. मागील काही दिवसापासून तो भोकरमध्ये पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र, शुक्रवारी तो नवीन मोंढा परिसरात गावठी कट्टे आणि काडतूस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस आढळून आले. संजय हा पाणीपुरीच्या व्यवसायाखाली मध्यप्रदेशातून आणलेले गावठी कट्टे नांदेडमध्ये विक्री करायचा. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून, शिवाजीनगर पोलिसांकडून याबाबत तपास सुरु असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली आहे.
हिंगोलीत देखील गावठी कट्यावर कारवाई...
नांदेडप्रमाणे हिंगोलीत देखील पोलिसांनी गावठी कट्टयावर कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंगोली जिल्हयात अवैध धंद्यांविरूध्द व बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुध्द कार्यवाहीची विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक पंडीत कच्छवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून हिंगोली जिल्हा हददीत गोपनीय माहिती काढुन कार्यवाहीचे आदेश दिले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने शुक्रवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कळमनुरी पोलीस स्टेशन हद्दीतील भागवत विश्वनाथ जाधव (वय 28 वर्ष, रा. वाकोडी, ता. कळमनुरी) यास ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक धारदार शस्त्र तलवार मिळून आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी भागवत विश्वनाथ जाधववर गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: