नांदेड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला त्यांच्या परवानगीनंतरच जाणार असल्याचं राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं. ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी परिस्थिती चिघळल्याने देशमुख कुटुंबीयांनी आपल्याला भेटायाला येऊ नका अशी विनंती केली होती. त्यामुळेच आपण त्यांना भेटायला गेले नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. माहूर गडावरील श्री रेणूका मातेची विधीवत पूजाअर्चा करुन आरती केली. तसेच अभिषेक करुन त्यांनी देवीला साडी अर्पण केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. 


पंकजा मुंडे म्हणाल्या की, "सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) घडल्यानंतर मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनीच मला विनंती केली की परिस्थिती चांगली नाही, तुम्ही येऊ नका. आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधीच जाहीर केल आहे. माझ्या जाण्यापेक्षा न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. मी तिथे जाणे, संवेदना व्यक्त करणे हा माझा वैयक्तिक विषय आहे. त्याचं जगासमोर प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही."


देशमुख कुटुंबीयांनाही माहिती आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. मारेकऱ्यांविषयी माझ्या मनात कोणतीही सहानुभूती नसणार, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कशासाठी? असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 


जालन्याच्या पालकमंत्रिपदावर मी आनंदी 


पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही. माझ्या राजकीय आयुष्यात मी एक टर्म मंत्री राहिले आहे. तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते. पण आता जे पद दिलं ते मी आनंदाला स्वीकारले. बीडचे पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता. जालन्याचे पालकमंत्रिपद दिले तरी आनंद आ, हे लोक आनंदी आहेत. मी नाराज अजिबात नाही. जालन्यातील लोक माझे स्वागत करत आहेत. जालन्यासाठी चांगलं करण्याची संधी मला मिळत आहे. बीड माझंच आहे. बीडसाठी मी काम करणारच आहे. आतापर्यंत जो पक्षाने निर्णय दिला तो मी मान्य केला. माझ्यावर प्रेम करणारे लोक जालन्यात देखील आहेत."


एकूण पुढची परिस्थिती पाहता पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं असं मी फार पूर्वी म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यापैकी कोणी नेतृत्व स्वीकारलं तर मी स्वागतच करणार असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. 


ही बातमी वाचा: