NEET Success Story:  नांदेड जिल्हयातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तीने शेतात काम करुन नीट परीक्षेची तयारी केली. या परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या (NEET Exam) परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.


अंकुश कंधारे यांच्याकडे अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. कंधारे यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांची मुलगी ज्योती कंधारे अभ्यासात हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बारावीपर्यंत तिने आपले शिक्षण गावातच पूर्ण केले. 


ज्योती दहावीत असताना कोरोना महासाथीमुळे लॉकडाऊन लागले होते. या महासाथीच्या काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू होती. डॉक्टरांकडून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे ज्योतीने सांगितले. 


युट्यूब व्हिडीओची मदत


बारावी झाल्यानंतर तिने नीट परीक्षेची तयारी सुरू केली. गावात काही जणांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यांच्या कडून मार्गदर्शन घेउन ज्योतीने अभ्यास सुरू केला. युट्यूबवरील व्हिडिओ (You Tube video for Study) पाहून देखील ती अभ्यास करायची. सकाळी शेतात जाऊन सहा तास काम, शेतात काही तास अभ्यास आणि घरी आल्यावर पाच ते सहा तास अभ्यास करायची.


नीट परीक्षा उत्तीर्ण


ज्योतीला नीटच्या परीक्षेत (NEET Exam 2023) 720 पैकी 563 गुण मिळाले आहेत.  स्वतःच आणि आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्योतीला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचे आहे.  मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अडथळ्यांची शर्यत संपण्याची चिन्ह नाहीत. सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला तर तरच ती डॉक्टर होण्याची शक्यता आहे. खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करण्याची तिची आर्थिक क्षमता नाही.


दरम्यान,  नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली 13 भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा  वरुण चक्रवर्ती 99.99 टक्क्यांसह देशात प्रथम तर राज्यात श्रीनिकेत रवीनं पहिला क्रमांक  पटकावला. श्रीनिकेत रवी हा देशातून सातव्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत नाशिकमधील आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे.तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 रँक आला आहे.


देशभरातून 20 38596 विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे त्यानंतर महाराष्ट्रचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे. पुढील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 720 पैकी 137 गुण (50 परसेन्टाईल ) आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी ,एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना 720 पैकी 107 गुण (40 परसेन्टाईल )आवश्यक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI