नांदेड : नोकरी हे काचेचं भांडं असतं, त्यामुळे नोकरीत जपून वागावं असं म्हणतात, त्यात सरकारी नोकरी असल्यावर जास्त काळजी घ्यावी लागते. मात्र, नांदेड (Nanded) जिल्हा परिषदेतील एका प्रशासन अधिकाऱ्यास आपले वर्तन भोवले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे निलंबन केले आहे. परिषदेतील दुसऱ्या विभागात आपली बदली केल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. रात्री 2 वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव असून या घटनेनं नांदेड जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने हा मेसेज केला होता. त्यामुळे, या कृत्याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले आहे. एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, निलंबन काळात आनंद सावंत यांना कुठलीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, तसेच निलंबन काळातील त्यांचे मुख्यालय गाव पंचायत हेच असणार आहे. या काळात त्यांना निलंबित निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहिल, असेही आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू