Nanded News: गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसतोय. तर गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी या  दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान शहरात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. नांदेड वाघाळा महापालिकेच्या गलथान कारभारामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. तर शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. 


शहरातील नागरिकांचे हाल...


गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत असून, रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आलेय. तसेच मान्सून पूर्व नाले सफाई न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्ते पाण्याखाली आहे. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे पहिल्याच पावसात शहराची गटार गंगा झाली आहे. मान्सून पूर्व तयारीच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या नांदेड वाघाळा महापालिकेचे पावसामुळे पितळ उघडे पडलेय. मात्र याचा नाहक त्रास सर्वसामान्य नांदेडकरांना सहन करावा लागत आहे.


महामार्ग अजूनही बंदचं...


नांदेड जिल्ह्यात व आसना नदी परिसरातील वरील भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय. नांदेड शहरास जोडणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या पुलावरून अजूनही पाणी वाहत आहे. त्यामुळे नांदेड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग, नांदेड-वसमत राज्य महामार्ग, नांदेड-पूर्णा राष्ट्रीय महामार्ग, किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्ग राहदरीसाठी बंद करण्यात आले आहेत. 


घरांमध्ये पावसाचे पाणी...


नांदेड जिल्ह्याची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जोरदार पावसामुळे 84 टक्के भरलाय. तर जिल्ह्यात 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात184 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हाभरातील 34 छोटी मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले आहेत. तर किनवट, हिमायतनगर, हदगाव, तामसा, मालेगाव, अर्धापुर, भोकर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या पुलावरून पाणी जाऊन ते वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झालाय.  सोबतच चिखली, पिंपळगाव, कोंढा, निळा, एकदरा, आलेगाव, देगाव, कासारखेडा, गणपूर, मुदखेड यासह अनेक गावांना पुरामुळे वेढा पडला आहे.  त्याचबरोबर मुदखेड, नांदेड, अर्धापुर, उमरी, मुखेड, बिलोली,किनवट, हदगाव या शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेय.