Nanded News Updates: नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (Nanded Swami Ramanand Teerth Vidyapeeth) एक भन्नाट शोध लावला आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. ओमप्रकाश येमूल यांच्या विद्यार्थी समूहाने धान्यापासून खाण्यायोग्य प्लास्टिक निर्मितीचा म्हणजेच 'बॉयोप्लास्टिक'चा शोध लावला आहे. दरम्यान जगातील प्लास्टिक प्रदूषण समस्येला पर्याय म्हणून हे बॉयोप्लास्टिक येत्या काळात मानवाला वरदान ठरणार आहे.आता प्लास्टिकला तोड म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जैविक प्लास्टिक हा पर्याय देत आहे.
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलातील एम.एस्सी. द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, गहू, सोयाबीन आणि तूरडाळ यासारख्या संपूर्ण धान्याच्या पिठाचा कच्चा माल म्हणून वापर करून पातळ फिल्मची निर्मिती केली आहे. खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिक हे आरोग्यास हानिकारक नसलेले आणि लहान प्राणी किंवा मनुष्याला सहज सेवन करता येऊ शकणारे पदार्थ असतात. पेट्रोलियम आधारित कृत्रिम प्लास्टिकपेक्षा खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिकचे फायदे अधिक असतात.
बॉयोप्लास्टिक निर्मितीला निश्चितच चांगले भविष्य
दरम्यान रसायनशास्त्र संकुलातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी गहू, ज्वारी,बाजरी, मका, तांदूळ या पासून चक्क प्लास्टिक निर्मितीचा शोध लावलाय.या बॉयोप्लास्टिक निर्मितीला निश्चितच एक चांगले भविष्य आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जगासमोर बॉयोप्लास्टिक ही संकल्पना किंवा शोध आपण मांडतेय ही निश्चितच आपल्या विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब असल्याचं कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी म्हटलं आहे. जे प्लास्टिक पर्यावरणास अनुकूल आणि पुनर्वापर करण्यायोग्य असल्याचे , प्रा. डॉ. ओमप्रकाश येमुल यांनी सांगितलं आहे.
हे प्लास्टिक बाजारच्या पिशवीसह भाकरी, डोसा किंवा इतर पदार्थ बांधून नेण्यासाठी उपयोगी
रसायनशास्त्राच्या (पॉलिमर केमिस्ट्री) च्या प्राध्यापक येमूल व विद्यार्थी सोनिया खानसोळे, स्नेहा देशमुख, सुजाता जाधव, रितिका मणी, वैष्णवी ठोकळ, साक्षी काळे आणि बेग फिजा मिर्झा अमान यांनी ह्या प्लास्टिक फिल्म्सची निर्मिती केली आहे. दरम्यान हे प्लास्टिक व्यतिरिक्त तृण धान्यापासून दिवे, चमचा,चहाची कपबशी असे इतरही दैनंदिन जीवनातील वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. सदर प्लास्टिक मधून बाजारची पिशवी, भाकरी, डोसा किंवा इतर पदार्थ बांधून नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सदर प्लास्टिक हे विघटणशील असून ते तीन महिने टिकते आणि तीन आठवड्यात त्याचे विघटन होते. हे खाण्यास सुद्धा योग्य आहे.ज्या प्लास्टिकचा मानवी शरीर आणि वातावरणावर दुष्परिणाम अथवा प्रदूषण होत नसल्याने भविष्यात हे प्लास्टिक मानवाला वरदान ठरू शकते.