नांदेड : शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) 24 तासांमध्ये 24 रुग्णाच्या झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांची समिती (Health Director Committee) मंगळवारी नांदेडला जाणार आहे. त्याचसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे देखील नांदेडमधील रुग्णालयाला भेट देणार आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये 24 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital) पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत होती.
घडलेली घटना दुर्दैवी, चौकशी करणार
यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, नांदेडमध्ये दररोज 1500 ते 1600 रुग्ण याठिकाणी येतात. आजूबाजूच्या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने रुग्ण नांदेडमध्ये येतात. मृतांमध्ये 12 बालके आहेत, त्यापैकी 48 तासात दाखल झालेले 6 बालके होती तर 24 तासात दाखल झालेली सहा बाळं होती. त्यामध्ये साप चावल्याने दोघांचा मृत्यू झाला. गंभीर आजारामुळे सात जण दगावले तर प्रसूतीमुळे एक आणि हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे 24 तासात 24 मृत्यू झाले आहेत हे खूप दुर्दैवी आहे. मंगळवारी मी स्वतः नांदेडला जाणार आहे. त्याआधी मी अधिकाऱ्यांना नांदेडला पाठवलं आहे, त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल.
संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे; अशोक चव्हाणांची मागणी
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी तातडीने रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. 24 मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश असल्याने या बातमीने खळबळ उडाली आहे. एवढे मृत्यू 24 तासात कसे झाले याबाबत चव्हाणांनी अधिष्ठातांकडून माहिती घेतली. धक्कादायक म्हणजे आणखी 70 रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. सध्या या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज चव्हाणांनी व्यक्त केली. रुग्णालयातील नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा तातडीने सरकारने याची दखल घ्यावी. ज्या कमतरता या रुग्णालयात आहेत त्याची तातडीने पूर्तता करावी, घटनेची चौकशी करावी अशी मागणी चव्हाणांनी केली.
ही बातमी वाचा: