Nanded News: मागील दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावलीय. अतिमुसळधार पावसाने नांदेडच्या (Nanded) सहा तालुक्यातील 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.


नांदेडमधील विविध तालुक्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला होता.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अपघाताच्या काही घटनाही घडल्याचे समोर येत आहे.


सहा तालुक्यातील १४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी


नांदेड जिल्ह्यातील बिलोली, कंधार , लोहा , किनवट , धर्माबाद व उमरी या सहा तालुक्यांमध्ये 14 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला असून जिल्ह्यात यंदाच्या मौसमातील पावसाची पहिल्यांदाच चांगली हजेरी लागली आहे.


बिलोली तालुक्यातील ४ महसूल मंडळांमध्ये जोरदार पाऊस


जिल्ह्यात 15 व 16 जुलै रोजी झालेल्या पावसाने सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली तालुक्यातील बिलोली 79.75 मिमी , सगरोळी 67.75, आदमपूर 103.25 तर रामतीर्थ गावांमध्ये 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 


कंधार तालुक्यातील तीन महसूल मंडळात अतिवृष्टी


कंधार तालुक्यातील फुलवळ पैठण बारूळ या तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून फुलवळ 137.25 ,पेठवडज ७१.२५, बारूळ ७१.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


लोहा, किनवट तालुक्यातही मुसळधारा


लोहा तालुक्यातील माळाकोळी महसूल मंडळात 86.50 मिलिमीटर पाऊस झाला असून किनवटमधील जलधारा १६० मिलिमीटर तर सिंदगी महसूल मंडळात 67.75 मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली.


उमरी, धानोऱ्यात जोरदार पावसाची नोंद


किनवटमधील जलधारा १६० मिमी, जिंदगी 67.75 मिनी पावसाची नोंद झाली असून धर्माबाद तालुक्यात जारीकोट 78.50, सिरजखेड 118.50 व धर्माबाद महसूल मंडळांमध्येही 69.50 मिमी पावसाची नोंद झाली. उमरी तालुक्यातील धानोरा महसूल मंडळात 76.25 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.


जुलैच्या मध्यावर नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची बँटींग सुरु असली तरी यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.


पुराच्या पाण्यात प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून, रिक्षाचा चुराडा, तीन जण बचावले


रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशांसह रिक्षा वाहून गेल्याची धक्कादायक घटना (Accident) नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुपटी येथे घडलीय. यात रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षातील तिघेही बचावले आहेत..


पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की हा ऑटो पुराच्या पाण्यात जवळपास दीड किलोमीटर वाहत गेला. या घटनेत कुठलिही जीवित हानी झाली नाही. मात्र, या रिक्षातील आदिवासी महिला व पुरुष ऑटोच्या व पुराच्या पाण्यातून बाहेर निघण्यासाठी एका झाडाच्या मुळीचा आधार घेत घेत बाहेर निघाल्याची माहिती या घटनेतील ऑटो चालक परमेश्वर ढाले यांनी दिली आहे.


हेही वाचा:


Nanded News: पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मानवी साखळीच्या मदतीने गावकऱ्यांनी केले रेस्क्यू