Nanded News: रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशांसह रिक्षा वाहून गेल्याची धक्कादायक घटना (Accident) नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुपटी येथे घडलीय. यात रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षातील तिघेही बचावले आहेत..


कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रस्त्यावरील  कुपट्टीच्या पुलावर पुराचे पाणी आले होते. या पाण्यात रिक्षासह तीनही प्रवाशी वाहून गेले. या रिक्षात दोन महिला आणि एक पुरुष असे तीघेजण होते. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की रिक्षा पुराच्या पाण्यात जवळपास दीड किमी वाहत गेली. या घटनेत वाहून गेलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे.


रिक्षाचा चुराडा, जिवित हानी नाही


पुराच्या पाण्यात ऑटो चालक परमेश्वर ढाले,लक्ष्मीबाई ढाले, आणि रंजनाबाई  टारपे  हे तिघेही बचावले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, रिक्षाचा चुराडा झाला असून या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. 


रिक्षाने दोन महिला आणि एक पुरुष हे तिघेजण कोसमेटहुन नंदगाव येथील नातेवाईकाकडे जात असताना ही घटना घडली आहे.


झाडाच्या मुळीचा आधार घेत आले वर


पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की हा ऑटो पुराच्या पाण्यात जवळपास दीड किलोमीटर वाहत गेला. या घटनेत कुठलिही जीवित हानी झाली नाही. मात्र, या रिक्षातील आदिवासी महिला व पुरुष ऑटोच्या व पुराच्या पाण्यातून बाहेर निघण्यासाठी एका झाडाच्या मुळीचा आधार घेत घेत बाहेर निघाल्याची माहिती या घटनेतील ऑटो चालक परमेश्वर ढाले यांनी दिली आहे.


लाल परीला लागली गळती


काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे लाल परीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे परभणीहून वसमतच्या दिशेने जाणाऱ्या बसला पावसामुळे गळती लागली. त्यामुळे अनेकांना बसमध्ये छत्रीचा आधार घ्यावा लागलाय.  अनेक प्रवासी बसमध्ये छत्री उघडून प्रवास करत होते. तर अनेकांचे अंग आणि कपडेसुध्दा पाण्याने पूर्ण भिजले होते. या अजब घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून प्रवाशांना बसमध्येही भिजत प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे.


राज्यातील प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तर हरकत नाही. परंतु, कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी प्रवासासाठी उपलब्ध व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा प्रवासांच्या वतीने करण्यात आली आहे. 


हेही वाचा:


लाल परीला पावसात पाण्याची गळती, छत्रीचा सहारा घेत प्रवाशांचा बसमधून प्रवास