Nanded News : सांगलीतील (Sangli) जत तालुक्यापाठोपाठ आता नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांची नाराजी पाहायला मिळत आहे. नांदेडमधील सीमावर्ती भागातील सहा तालुक्यातील गावांनी आम्हाला तेलंगणात (Telangana) सामील व्हायचं आहे, अशी मागणी केली आहे. यासाठीच नांदेडच्या सीमा भागात राहणारे नागरिक आज तेलंगणात सामील होण्यासाठी आंदोलन करणार आहेत. माहूर, किनवट, धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली तालुक्यातील काही गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे" या कृती समितीकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. तेलंगणा राज्यात समाविष्ट करा, यासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर, रास्ता रोको करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 


दरम्यान महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणात शेतकरी, मजूर, नोकरदार यांना सरकारकडून विविध योजनेअंतर्गत अर्थसहाय्य आणि मदत केली जाते. ज्यात शेतीसाठी मोफत वीज, पाणी आणि बी-बियाणे, शेती अवजारे, ट्रॅक्टर, विहीर, कृषीपंप आदी योजना आहेत. तर दिन बंधू योजने अंतर्गत मजूर कष्टकरी कुटुंबास घरे, व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि आरोग्य योजनेत तसंच शिक्षणात सवलत दिली जाते. तर दलित बंधू योजने अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना मोफत उच्च शिक्षण, घरे, व्यवसायासाठी आर्थिक मदत तसंच चार एकर जमिनीची तरतूद करण्यात आली. अशा विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी आज राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत धरणे आंदोलन केले जाणार आहे. 


जत तालुक्यातील गावांचा ठराव आणि राजकारण
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील काही गावं कर्नाटक सीमेलगत आहेत. जत तालुका हा दुष्काळग्रस्त आहे, या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर 2012 मध्ये जत तालुक्यातील ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं होतं. याचवेळी जवळपास 42 ग्रामपंचायतींनी पाणी द्या नाहीतर कर्नाटक राज्यात जाऊ असा पवित्रा घेत ठराव केला होता. हा ठराव या ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला त्यावेळी पाठवले होते. ही आक्रमक भूमिका घेतल्यानंतरही पाणी प्रश्न सुटला नाही. याच ठरावाचा आधार घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यामधील 40 गावांच्या ठरावाचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करणार असल्याचं म्हटलं आणि राजकारण तापलं. यानंतर बोम्माई यांनी आणखी एक ट्वीट करत सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये कान्नड भाषिक नागरिक राहतात, त्यामुळे हा भाग कर्नाटकाला मिळावा अशी मागणी केली.


VIDEO : Nanded protest : आम्हाला Telangana मध्ये सामील करा, जतनंतर नांदेडमध्येही आंदोलन ABP Majha