नांदेड:  जिल्ह्यात ड्रोन कॅमेरा (Drone Camera) उडविण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या 10 कि.मी परिघ क्षेत्रात 3 ते 4 मार्च 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या हवाई वाहतुकीची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे. सोबतच नांदेड जिल्ह्यात उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलन करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. 


अतिमहत्वाचे व्यक्ती हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सर्व ठिकाणी, तसेच कार्यालयांच्यासमोर 1 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 5 मार्च 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलने इ. आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 1 मार्च 2024 रोजी निर्गमित केले आहेत.


परीक्षा काळात शहरातील प्रमुख शाळांच्या परिसरात कलम 144 लागू


केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या इयत्ता दहावीची परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यात आली आहे. या परिसरात शांतता राखावी. तसेच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यात व्यत्यय होईल अशा पद्धतीचे कोणतेही कार्य करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. 15 फेब्रुवारी पासून 2 एप्रिल पर्यंत सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक या परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सकाळी आठ ते चार वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस या परिसरात प्रवेश करता येणार नाही.  तसेच ग्यानमाता विद्या विहार, किड्स किंगडम पब्लिक स्कूल, नागार्जुना पब्लिक स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड, एकलव्‍य रेजिडेन्शिअल स्‍कूल सहस्‍त्रकुंड, जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर, केंद्रीय विद्यालय, सीआरपीएफ मुदखेड या शाळा परिसरात 100 मीटर पर्यंतची हद्द शांततेत पाळण्यात यावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


HSC Exam : कोणी शाळेच्या भिंतीवर, तर कोणी झाडावर चढून पुरवतोय 'कॉपी'; जालन्यातील धक्कादायक व्हिडिओ आला समोर