HSC Exam Copy : राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षा (HSC Exam) सुरु असून, सर्वत्र कॉपीमुक्त अभियान राबवला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक परीक्षा केंद्रावर बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जालना (Jalna) जिल्ह्यात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. मंठा तालुक्यातील एका महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय. कोणी शाळेच्या भिंतीवर, तर कोणी झाडावर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 


जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. आज बारावी रसायनशास्त्राचा पेपर असून, या परीक्षा केंद्रावर खिडक्यांमधून सर्रास कॉपी पूरवतानाच दृश्य पाहायला मिळाले. परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा अक्षरशः खच पडला होता. तर, केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतांना देखील बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात आहेत. त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले भरारी पथक आहेत तर कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. सोबतच कॉपीमुक्त अभियानाला केराची टोपली दाखवल्या जात असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. 


कोणी शाळेच्या भिंतीवर, तर कोणी झाडावर चढून पुरवतोय 'कॉपी'


जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर पाठीमागून काही तरुण थेट भिंतीवर चढतांना पाहायला मिळत आहे. जीव धोक्यातघालून हे तरूण वरती चढत आहेत. तर, काहीजण झाडावर चढून परीक्षा केंद्रात कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सर्व जीवघेणा प्रकार पोलिसांच्या समोर सुरु होता. पोलिसांकडून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांना हाकलण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, याच कोणताही परिणाम होतांना दिसला नाही. 


प्रशासनाचा दावा फोल ठरतोय...


जालना जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी व परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या करीता जालना जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अशा 26 अधिकाऱ्यांचा समावेश असलेले नियंत्रण पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले. तसेच या कार्यालयामार्फत भरारी पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाहय उपद्रव होणार नाही या दुष्टीकोनातून पुरेसा बंदोबस्त ठेवण्याबाबत व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात यावी असे निर्देश दिले गेले आहेत. तसेच परीक्षा केंद्र प्रमुख पर्यवेक्षक, बैठे पथक भरारी पथक यांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. मात्र, असे असतांना बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 




इतर महत्वाच्या बातम्या : 


बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! मराठवाड्यात 40 कॉपीबहाद्दर पकडले