नांदेड : बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर अखेर राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागात जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक प्रकल्पात पाणीसाठा वाढतान पाहायला मिळत आहे. दरम्यान, नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणात देखील पाणीसाठा वाढला असून, सध्या विष्णुपुरी धरणात 84 टक्के पाणीसाठा असल्याने नांदेडकरांची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.


सुरुवातीलाच पाऊस उशिरा आल्याने जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता. विशेष नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक प्रकल्पात पाणीसाठा वाढला. दरम्यान, विष्णुपुरी धरणात सुद्धा जलसाठा वाढला. मात्र पुढे ऑगस्ट महिना पुन्हा कोरडा गेला. त्यामुळे नांदेडसह संपूर्ण राज्याचे लक्ष पावसाकडे लागले होते. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा सक्रीय झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना  मोठा दिलासा मिळाला. तसेच विष्णुपुरीत देखील पाण्याची वाढ झाली आहे. सध्या या धरणात  84 टक्के पाणीसाठा असून, नांदेडकरांची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.


जिल्ह्यातील परिस्थिती 



  • नांदेड जिल्ह्यातील अप्पर मानार प्रकल्पात सध्या 18 टक्के पाणीसाठा आहे.

  • लोअर मानार प्रकल्पात 55 टक्के पाणीसाठा आहे.

  • अप्पर इसापूर प्रकल्पात 69 टक्के पाणीसाठा आहे.

  • विष्णुपुरी धरणात 84 टक्के पाणीसाठा आहे.


शेतकऱ्यांना दिलासा... 


अनेक भागांत तब्बल 20 ते 25 दिवसांनंतर जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतामधील कोवळी पिके काही ठिकाणी पिवळी पडण्याच्या मार्गावर होती. मात्र गुरुवारी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतामधील सोयाबीन, तूर, उडीद, मुग, कापूस यासह भाजीपाल्याच्या पिकांना निश्चितच बहर येणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस पडला नसता तर खरीप हंगाम हातून जाण्याची भीती होती. 


मोठ्या पावसाची अपेक्षा कायम...


नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात वरून राजाचे आगमन झाले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती, यामुळे शेतकरी बांधव हतबल झाले होते. मात्र, अखेर 6 आणि 7 सप्टेंबर रोजी पावसाला सुरुवात झाली. जवळपास 20 दिवसांनंतर वरुण राजाचे आगमन झाले. विशेष म्हणजे आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाची शेतकरी बांधवास प्रतीक्षा आहे, कारण खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात सध्या पावसाची गरज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू; पुढील काही तासांत आवक आणखी वाढण्याची शक्यता