नांदेड : येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. असे असताना आता याच रुग्णालयात आणखी 72 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील 32 बालकं अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. यात वेळेपूर्वी जन्माला आलेल्या बालकांचा समावेश आहे. तर, रुग्णालय प्रशासनाकडून या बालकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू. विशेष म्हणजे नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील आतापर्यंत मृत्यूचा आकडा 35 वर पोहोचला आहे. 


शासकीय रुग्णालयात आता 72 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 72 गंभीरमध्ये 32 बालकांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत झालेल्या 18 मृत बालकांपैकी सहा जणांना डेंग्यू सदृश्य आजाराची लागण असल्याची माहिती समोर येत आहे. 7 बालकांचा मुदतपूर्व प्रसूती झाल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गणेश मनूरकर यांनी दिली आहे.  नांदेडमध्ये डेंग्यू साथीचा फैलाव असल्याचे देखील वैद्यकीय अधीक्षकांनी माहीती दिली आहे. तसेच, बेबी वार्मर 36 असले तरी संसर्ग होणार नाही याची काळजी घेतच बालकांवर उपचार सुरू असल्याचे सुद्धा ते म्हणाले आहेत. 


सध्या रुग्णालयातील परिस्थिती...


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण 1 हजार 585 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 823 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच 2 ऑक्टोंबर ते 3 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 221 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 118 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 6 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 2 नवजात बालक व 4 प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. गत 24 तासात 29 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 10 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 26 प्रसुती करण्यात आल्या. यात 12 सीझर होत्या तर 14 नॉरमल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.


विजय वडेट्टीवर यांची टीका...


एक उपमुख्यमंत्री आजारी म्हणून घरी बसतात. पालकमंत्री पदासाठी निवडलेला जिल्हा भेटत नाही म्हणून रुसून बसतात. मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात, म्हणजे लोक मरू दे, यांना राजकारण महत्वाचे आहे.भाजप चाणक्यला आमदार पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा आणि भरती करायला वेळ नाही.नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबिय धाय मोकलून रडत होते. नवजात बालकांचा काय दोष आहे? माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे सगळं पाहू शकत नाही.जे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना सरकारने आतातरी माणुसकी दाखवत प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत तातडीने द्यावी,अशी मागणी विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


विरोधकांकडून आरोप, सरकारकडून सारवासारव; त्यामुळे नांदेड प्रकरणाची सीआयडी चौकशीचं होऊ द्या; संजय शिरसाटांची मागणी