नांदेड : शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, यावरून प्रशासन आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे. मात्र, यासाठी प्रशासन जबाबदार नसल्याचा दावा सतत सरकारकडून केला जात आहे. असे असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या (Nanded Government Hospital) डॉक्टरांवर गंभीर आरोप केला आहे. या रुग्णालयात डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे (Birthday Celebration) एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली होती, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
दानवे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली. सोबतच याच रुग्णालयात मृत्यू पडलेल्या एका रुग्णांच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस देखील केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी सरकार आणि रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले."नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाचा कळस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. औषधांची कमतरता, निष्काळजीपणा, वर्षानुवर्षे मंजुरीसाठी पडून राहिलेल्या फाईली हेच या घटनेच्या मागचे कारण आहे. कोणत्या डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली, ज्याची किंमत तिला आणि तिच्या बाळाला जीव देऊन चुकवावी लागली? सरकार सांगेल का?, असे दानवे म्हणाले.
पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, "चौकशी वगैरे हे सगळे फार्स आहे. मनुष्यबळ अपुरे असेल तर ते का दिले गेले नाहीत? इथे लोक मारतात आणि सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला मुजरा मारायला जातात, हे वाईट आहे. तातडीने आनंदाचा शिधा मंजूर होतो (वाटला जातो की नाही, देव जाणे) पण औषधी आणि रुग्णालयात सुविधा देण्यासंबंधीच्या फाईली लाल फितीत अडकतात, हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, पालकमंत्री नियमितपणे रुग्णालयात येऊन बसले, आढावा घेतला तर डॉक्टरांची निष्काळजीपणा करण्याची हिंमतच होणार नाही, असे दानवे म्हणाले.
दानवेंकडून रुग्णालयाची पाहणी
नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवनंतर यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान आज अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, संबधित अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली. 24 तासांत 24 रुग्ण कसे दगावले याबाबत महिती देखील घेतली. तर, रुग्णालयात अस्वच्छता असून, औषधांचा देखील तुटवडा असल्याचे दानवे या पाहणीनंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: