नांदेड : भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर (Ram Patil Ratolikar) यांना मराठा आंदोलकांच्या (Maratha Protestors)  रोषाला सामोरे जावं लागलं आहे. राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी असताना आमदार गावात का आले? असा प्रश्न विचारत मराठा आंदोलकांनी आमदार रातोळीकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, याचवेळी काही तरुणांनी हातातील पाण्याचे जारने आमदार रातोळीकर यांच्या गाडीवर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आंदोलकांचा रोष पाहता आमदार रातोळीकर यांनी गावातून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आले आहेत. 


अधिक माहितीनुसार, मंगळवारी श्री दत्त जयंतीनिमित्त नांदेड तालुक्यातील कामठा खुर्द गावातील मंदीरा समोर गावकऱ्यांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी विधान परिषदेचे भाजप आमदार रातोळीकर हे काही कार्यकर्त्यांना घेऊन पोहोचले. दरम्यान, याचवेळी मराठा आंदोलक देखील त्या ठिकाणी जमा झाले. आंदोलकांनी आमदारांना मंदीरात दर्शन घेऊ दिले. मात्र, त्यानंतर बाहेर येताच 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांनी गावात न येण्याचा इशाराही दिला. तर, तात्काळ गावातून निघून जा असा इशारा दिला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी रातोळीकर यांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न केला. परंतू इतरांनी त्यांना रोखले. या प्रकारानंतर रातोळीकर यांनी गावातून काढता पाय घेतला.