Nanded: मराठवाड्यात गेल्या दोन  दिवसांपासून तुफान पाऊस येतोय. अनेक भागात पडझड झालीय. शिवारात पाणीच पाणीच झालाय. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून घरांचे, शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर कंधार तालुक्यातील कोटबाजार गावात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. या अपघातात गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर आणि त्यांची पत्नी, सध्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या, यांचा घराची भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

घराची भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शेख नासेर यांच्या घराच्या भिंतीला सततच्या पावसामुळे भेगा पडल्या होत्या. काल रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर भिंत अचानक कोसळली. ही भिंत थेट दाम्पत्याच्या अंगावर पडली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने ढिगारा हटवून त्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.या अपघातामुळे संपूर्ण कोटबाजार गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील सामाजिक, राजकीय आयुष्यात सक्रिय असलेले हे दाम्पत्य अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते. पोलिसांनीही तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

काल परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसतोय.शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू ज्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालाय.काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे आजही पाऊस सुरू असल्याने हे नुकसान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.