Nanded Ganesh Visarjan 2025 : नांदेड जिल्ह्यात गणेश विसर्जनाचे (Ganesh Visarjan 2025) उत्सव सुरळीत पार पडत असतानाच शहरालगतच्या गाडेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले गावातील दोन तरुण आसना नदीत बुडाले, तर तिसऱ्या तरुणाला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आलं आहे.
ही घटना शनिवारी (दि. 6 सप्टेंबर) सायंकाळी साडे सहा वाजता घडली. गाडेगाव येथून जवळ असलेल्या आसना नदी परिसरात विसर्जनासाठी गेलेल्या तरुणांपैकी बालाजी कैलास उबाळे (वय 18) आणि योगेश गोविंद उबाळे (वय 17) हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांच्यासोबत असलेला शैलेश इरबाजी उबाळे याला मात्र इतर तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ही घटना घडत असतानाच स्थानिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला.
पाय घसरल्यामुळे घडली दुर्घटना
प्राथमिक माहितीनुसार, गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या या तरुणांनी नदीत उतरून मूर्ती विसर्जन करत असतानाच अचानक एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही पाण्यात बुडू लागले. परिस्थिती लक्षात घेऊन घाटावर उपस्थित काही तरुणांनी शैलेश उबाळे याला बाहेर काढण्यात यश मिळवलं, मात्र बालाजी आणि योगेश हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
शोध मोहीम सुरूच
घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ पथक, महसूल विभाग, तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधारामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र बुडालेल्या तरुणांचा काहीही थांगपत्ता लागलेला नव्हता.
बालाजी उबाळे हा व्यावसायिक मोटरसायकल मेकॅनिक असून योगेश उबाळे एका कापड दुकानात काम करत होता. दोघेही गाडेगावचे रहिवासी असून, अत्यंत मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
आमदारांनी घेतली भेट
घटनेची माहिती मिळताच नांदेड दक्षिण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आनंद बोढारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाकडून शोध मोहिमेची माहिती घेतली आणि पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना त्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दरम्यान, बुडालेल्या तरुणांचे मृतदेह लवकरात लवकर सापडावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आणखी वाचा