Nanded News नांदेड महापालिका गुंठेवारी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिसांना यश मिळाले नाही. पोलिसांचा शोध आणि तपास सुरु असतानाच या प्रकरणात 'ईडी'ने उडी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. येणाऱ्या काळात लवकरच 'ईडी'चे दुसरे पथक नांदेडमध्ये धडकणार आहे. ईडीचे पथक गुंठेवारीसोबतच बीएसयुपी कामाचीही चौकशी करणार असल्याची दबक्या आवाजात महापालिकेत चर्चा सुरू आहे. दरम्यान गुंठेवारी प्रकरणात ईडी चौकशीसाठी अधिकारी धडकल्याने महापालिकेतील अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी मात्र मुंबईला पळ काढला आहे. एकंदरीत या प्रकरणावरून आता महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सत्ता ही कॉंग्रेसच्या ताब्यात होती. महापालिकेचा कार्यकाळ संपला परंतु निवडणुका लांबल्याने सध्या महापालिकेवर प्रशासकराज असून आयुक्त डॉ. सुनील लहाने हे कामकाज पाहत आहेत. गुंठेवारी विभागामधील पदाधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांवर दबाव टाकत बनावट गुंठेवारीचे प्रकरण करुन घेतले. त्यावर बनावट ठप्पे, बनावट स्वाक्षऱ्या केल्याने प्रकरण उघडकीस आला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्यात गुंठेवारी विभागातील दोन तत्कालीन कंत्राटी अभियंते, एक कर्मचारी आणि दोन लाभार्थी अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


अखेर वजिराबाद पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला


दरम्यानच्या काळात पोलिसात तक्रार गेल्यानंतरही गुन्हा दाखल होत नव्हता. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा गोंधळ उडाला आणि हे प्रकरण आपल्या अंगलट येईल की काय म्हणून वजिराबाद पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. परंतु अद्याप तपासात पोलिसांना यश मिळाले नाही. महापालिकेने यातील एका कर्मचाऱ्याला निलंबित केले मात्र तो सध्या फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 


महापालिका प्रशासनाकडून ईडी पथकाबाबत गोपनीयता


तपास सुरु असताना ईडीचे पथक नांदेडमध्ये धडकल्याची माहिती समोर आली. महापालिका प्रशासनाकडून ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. मात्र या गोपनीय माहितीचे अखेर बिंग फुटले आणि ईडी अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना कामाला लावले आहे. गुंठेवारी प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. लवकरच दुसरे एक पथक नांदेडला धडकणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. यासोबतच पथक हे आता बीएसयूपी आणि महापालिकेतील अन्य कामांचीही चौकशी करणार आहे.  या प्रकरणाची तक्रार ईडीकडे कोणी केली? याचा शोध सध्या सुरु आहे.