Nanded News : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कामठा येथील श्रीक्षेत्र देव खंडेरायच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. माळेगाव यात्रेनंतर नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अधार्पूर तालुक्यातील कामठा बु. येथील जागृत देवस्थान खंडेरायाची यात्रा ही प्रसिद्ध असून या यात्रेत तलवारीचे वार अंगावर झेलण्याची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. चार जिल्ह्यातून सर्व जाती धर्माचे भाविक मोठ्या संख्येने येतात आणि राष्ट्रीय सलोखा, ऐक्य जोपासणारे चित्र आपणास पाहायला मिळते.
पाच दिवसांची खंडेरायाची यात्रा
कामठा (बु.) येथील खंडेराया यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. आज खंडेरायाच्या विधीवत पूजा, आरत्या आणि छबीना निघणार असून श्री खंडेरायांचा भव्य पालखी सोहळा निघणार आहे. त्यानंतर उद्या (21 जानेवारी) आणि परवा (22 जानेवारी) भव्य शंकरपट स्पर्धा आयोजित आली आहे. तर 23 जानेवारी आणि 24 जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचे सामने होणार आहेत. अशा या पाच दिवस चालणाऱ्या खंडेराया यात्रेसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूरसह मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धने देवदर्शनासाठी इथे येतात.
पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी
यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात हजारो भाविक भक्त, महिला सहभागी होतात. पालखीसमोर ढोल ताशाच्या गजरात खंडोबाचे वारु चाबकाचे वार आपापल्या हातापायावर घेत भाविक टिपरे, बताशाचा प्रसाद आणि शाल पालखीवर पांघरुन देवाचे दर्शन घेतात. दरम्यान गावाच्या मध्यभागी बुरुजाजवळ दिगंबर हैबतराव जंगे हा भाविक नंग्या तलवारीचे पाच वार स्वतःच्या उघड्या पाठीवर आणि पोटावर घेतो. हे रोमहर्षक दृश्य पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी होते. शेवटी मंदिराजवळ भाविक लोटांगण घेतात आणि त्यावरून पालखी मंदिरात जाऊन विसर्जित होते.
मागील महिन्यात माळेगावमधील यात्रा संपन्न
मागच्या महिन्यातच दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव इथली यात्रा शासकीय पूजा करुन, देवस्वारी पालखी काढून यळकोट यळकोट जय मल्हारच्या जय घोषात उत्साहात सुरु झाली. 22 डिसेंबर रोजी दुपारी शासकीय पूजा आटोपून देवस्वारी पालखी मिरवणूक काढून, खोबरे, बेल भंडारा उधळत, यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात यात्रेला सुरुवात झाली होती. दरम्यान या यात्रेत देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, खेचर, कुत्रा, मांजर, बैल, गाय म्हैशी घेऊन व्यापारी नेहमीप्रमाणे या यात्रेत दाखल झाले आहेत.
संबंधित बातमी