Nanded Accident : नांदेड जिल्ह्यातील भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहन चालकाचे गाडीवरील  नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यावेळी गाडी थेट हाळदा-मोघाळी गावाजवळ असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन नदीत कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असतांना दोघींचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात 4 जण किरकोळ आणि 1 जण गंभीर जखमी झाला आहे. 


भोकर येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने परत जात असतांना त्या वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला. त्यामुळे रस्त्यावरील हाळदा-मोघाळी या गावाच्या मधील शिवारात असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन ते वाहन नदीत कोसळले. रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने त्या वाहनातील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धाऊन गेले. तसेच त्यांनी झालेल्या भिषण अपघाताची माहिती भोकर पोलीस ठाण्यात कळवली. मात्र, तोपर्यंत तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. 


अपघातात 5 जणांचा मृत्यू... 


ज्यात सविता श्याम भालेराव (30 वर्षे),प्रिती परमेश्वर भालेराव (8 वर्षे)दोघी ही रा.रेणापूर ता.भोकर व सुशिल मारोती गायकवाड( 9 वर्षे)  (रा.रामखडक ता.उमरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, रेखाबाई परमेश्वर भालेराव (30वर्षे),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (वय 28 वर्षे),श्याम तुकाराम भालेराव (35 वर्षे) तिघे ही रा. रेणापूर ता. भोकर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले. परंतू, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.


जखमींवर उपचार सुरु...


तसेच, जखमी श्याम तुकाराम भालेराव यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत.तसेच जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (9 वर्षे),प्रितेश परमेश्वर भालेराव (8 वर्षे),सोहम ज्ञानेश्वर भालेराव (7 वर्षे), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव( 28 वर्षे) सर्वजण (रा.रेणापूर ता.भोकर) यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. 


मयत व जखमी एकाच कुटुंबातील


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत व जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत.सदरील दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे. उत्तरीय तपासणी नंतर मयत पाचही जणांवर रेणापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच पुढील तपास व कारवाई पो.नि.सुभाचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Buldhana Accident : पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; 18 प्रवासी जखमी, आठ जणांची प्रकृती गंभीर