नांदेड : 'पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस 'सागर' बंगल्यावर बसलाय, असे वक्तव्य करणारे भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर आता विरोधकांकडून टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'असे वक्तव्य करणं म्हणजेच ही सत्तेची गर्मी  असल्याचा' टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे. तर याचवेळी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील राणे यांच्यावर टीका केली आहे. 


दरम्यान नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की, "ही सत्तेची गर्मी आहे. त्याच गर्मीच्या आधारावर हे लोक असे वक्तव्य करतात. या लोकांना लोकशाही मान्यच नाही. हिंदू मुस्लिमांमध्ये अशाप्रकारे वाद निर्माण करून, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं पाप सुरू आहे. हे सर्व काही भयानक आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आता भाजपला माफ करणार नाही," असे नाना पटोले म्हणाले. 


अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया...


नितेश राणे यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की," हे वक्तव्य खूप गंभीर आहे. अशाप्रकारे वक्तव्य कोणीही करू नयेत. राज्यात आणि देशात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षातील लोकांनी जबाबदारांनी बोलले पाहिजे. लोक आपल्या वक्तव्याकडे पाहतात. त्यामुळे अशाप्रकारे वक्तव्य करणं अपेक्षित नाही. सत्ताधारीच नाही तर कोणीही अशा प्रकारे वक्तव्य करू नयेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.


काय म्हणाले होते नितेश राणे? 


माझं काही वाकडं होणार नाही, पोलिसांसमोर बोलतोय. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याच्या कानाखाली 12 वाजवल्याशिवाय गप्प बसायचे नाही. माळशिरस येथील तहसील कार्यालयात काही अधिकारी मुस्लिम तुष्टीकरण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हिंदूंच्या कार्यक्रमात कोणती गाणी वाजवायची हे सांगणारे अधिकारी कोण असा सवाल करीत राणे यांनी प्रशासनावर देखील जहरी टीका केली. आता तुम्हाला वाचवायला लोकशाही आघाडीचे पवार किंवा उद्धव ठाकरे वाचवायला येणार नाहीत असा इशाराही दिला. 


प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आघाडीत सहभागी होतील 


दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपबाबत देखील प्रतिक्रिया दिली. "वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमची एकच भूमिका आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत आघाडीत सहभागी होतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. याचवेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या आदेशावरून राज्य सरकारने मराठा समाजासह ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nitesh Rane Controversial Statement : पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय: नितेश राणे