नांदेड: दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथील यात्रा शासकीय पूजा करून, देवस्वारी पालखी काढून यळकोट यळकोट जय मल्हारच्या जय घोषात उत्साहात सुरू झाली. आज दुपारी 2 वाजता शासकीय पूजा आटोपून देवस्वारी पालखी मिळवणूक काढून, खोबरे, बेल भंडारा उधळत, यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात यात्रेला सुरुवात झाली. दरम्यान या यात्रेत देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, खेचर, कुत्रा, मांजर, बैल, गाय म्हैशी घेऊन व्यापारी नेहमीप्रमाणे या यात्रेत दाखल झाले आहेत.


"उत्‍तम जागा पाहूणी, मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी" या जयघोषात, यळकोट यळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करत पारंपरीक पध्‍दतीने यात्रेला सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला असल्याने भाविकांमध्ये  मोठा उत्साह पहायला मिळत आहे. 


श्री क्षेत्र खंडोबाच्‍या व मानकऱ्यांच्‍या पालखीचे जिल्हा परिषदेच्या वतीने स्‍वागत करण्‍यात आले. तसेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा  करण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आशाताई श्यामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,  जिल्हा परिषद आदींची उपस्थिती होती. 


पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्‍यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्‍यात आला. पारंपारीक पध्‍दतीने कवडयाच्‍या माळा, माळी लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी खंडोबाची पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी खंडोबा पालखी सोहळा व वाघ्‍या मुरळीला पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली.


दरम्यान या यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश आणि देशगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक आणि व्यापारी दाखल झाले आहेत. या दरम्यान काही अप्रिय घटना अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड जिल्ह्यासह, राज्य राखीव पोलीस बल आणि परभणी, हिंगोली, लातूर  या चार जिल्ह्यातील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.