Nanded News: नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. नायगाव तालुक्यातील मांजरम, कोलंबी परिसरात आठवडा भराच्या विश्रांतीनंतर जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरात पाणीच-पाणी दिसून येत आहे. मांजरम परिसरात आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असून सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत.


नांदेड जिल्ह्यात 23 जुलै ते 25 जुलै पर्यंत पाऊस पडला त्यानंतर मध्यतरी पावसाने विश्रांती दिली होती. मात्र आज पुन्हा ढगफुटी समान पाऊस झाल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. नायगाव तालुक्यातील मांजरम शिवारात पहाटेच्या साडेतीन ते साडेचार दरम्यान ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान आज झालेल्या पावसाची नोंद या भागात 72 ते 85 मी मी नोंद करण्यात आलीय. त्यामुळे पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.


पिकाचे मोठया प्रमाणत नुकसान


नांदेड जिल्ह्यात व तालुक्यात गेल्या महिन्याच्या सात जुलै पासून 15 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठयाप्रमाणत नुकसान झाले होते. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. तर बऱ्याच लोकांना पुरात वाहून गेल्याने आपला जीवही गमावावा लागला. तर या अतिवृष्टीने अनेक घराची पडझड झाली होती. त्यानंतर तालुक्यात कडक ऊन पाहायला मिळाल्याने,  उकाडा जाणवत होता. मात्र आज पुन्हा एकदा मांजरम परिसरात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन नदी नाल्याना पूर आला आहे. नदी काठावरच्या शेताचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.