नांदेड : लग्नाच्या वरातीत काही युवक गेल्यामुळे नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार गावात 1 जून रोजी रात्री दोन गटात हाणामारी झाली होती. त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अक्षय भालेराव असं या मृत युवकाचं नाव आहे. या युवकाच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
नांदेड मधील बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे वाद झाला होता आणि त्यामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली होती. त्यावरुन आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दलित तरुणाने आंबेडकर जयंती साजरी करण्यात पुढाकार घेतल्यामुळे सवर्ण तरुणांनी त्याची हत्या केली, असा आरोप माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. गुन्हेगारांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपीना अटक केलीय, गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बोंडार गावात झालेल्या हाणामारीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात झालेल्या दगडफेकीत काही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे. या प्रकरणी काही जण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
पोलिसांवर दबाब असल्याचा युवा पँथर संघटनेचा आरोप
नांदेड मधील बोंढार हवेली गावात झालेल्या अक्षय भालेराव या युवकाच्या खून प्रकरणात पोलीसांवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर दबाव टाकत असल्याचा आरोप युवा पँथर संघटनेने पत्रकार परिषदेत केला. शिवाय मयत युवकाच्या कुटुंबाला शासनाने पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला आणि शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा अशा मागण्या युवा पँथर कडून करण्यात आल्या आहेत.