Nanded News: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा (Heavy Rain) सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. ज्यात सुमारे 7 लाख 41 हजार 946 शेतकऱ्याचे 5 लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल संबंधित विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर आता अखेर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे प्राप्त निधी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रीया वेगात सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली. 


ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी निधी प्राप्त झाला आहे. निधीचे वाटप तालुकास्तरावर झालेले आहे. संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेमार्फत ही नुकसान भरपाई रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याला यापूर्वीच 8 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार इतराच्या अगोदर निधी मिळाला होता.


तालुकानिहाय प्राप्त निधी 


नांदेड- 25 कोटी 89 लक्ष, अर्धापूर -29 कोटी 16 लक्ष, कंधार -55 कोटी 12 लक्ष, लोहा 61 कोटी 5 लक्ष, देगलूर 42 कोटी 95 लक्ष, मुखेड 54 कोटी 70 लक्ष, बिलोली- 40 कोटी 35 लक्ष, नायगाव- 45 कोटी 5 लक्ष, धर्माबाद- 29 कोटी 53 लक्ष, उमरी- 40 कोटी 11 लक्ष, भोकर- 52 कोटी 43 लक्ष, मुदखेड- 24 कोटी 27 लक्ष, हदगाव-85 कोटी 20 लक्ष, हिमायतनगर- 42 कोटी 74 लक्ष, किनवट-67 कोटी 9 लक्ष, माहूर- 22 कोटी 20 लक्ष असे एकूण जिल्ह्यास 717 कोटी 88 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून वाटप सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


शेतकऱ्यांना मोठा दिलासा...


जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने घरांसह शेतजमीन पाण्याखाली आल्या होत्या. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. तर काही ठिकाणी अक्षरशः शेतातील पिकांसह मातीही वाहून गेल्याचे चित्र होते. त्यामुळे सरकारने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते. दरम्यान नांदेड जिल्ह्याला नुकसानभरपाईचे 717.88 कोटींचा निधी प्राप्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.