Nanded News: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहरीवर पाणी भरण्यास गेलेल्या महिलेला चक्क वानराने विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडलीय. दरम्यान विहिरीशेजारी असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगत या महिलेला विहिरीच्या बाहेर काढल्याने, मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र विहिरीत पडल्याने महिला जखमी झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगावात असलेल्या एका विहिरीतून गावातील महिला पाणी आणतात. दरम्यान गावातील पल्लवी पंडीत ताबारे या नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी हंडा घेऊन विहिरीवर गेल्या होत्या. विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या वाकताच मागून आलेल्या एका वानराने त्यांना विहिरीत ढकलून दिले. त्यामुळे त्या विहिरीत पडल्या.
गावकऱ्यांनी महिलेला विहिरीतून काढले बाहेर
पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या पल्लवी ताबारे यांना वानराने विहिरीत ढकलून देताच त्या आतमध्ये पडल्या. यावेळी त्यांची आरडाओरड आयकून बाजूला असलेल्या गावातील इतर लोकांनी तात्काळ विहिरीजवळ धाव घेतली. त्यानंतर काहींनी विहिरीत उडी मारून पल्लवी ताबारे यांचा जीव वाचवत त्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोती दुर्घटना टळली आहे.
इस्लापूर वन विभागाला अनेक वेळा या वानरांचा बंदोबस्त करा असे ग्रामपंचायतने ठराव दिलाय. मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने इस्लापुरकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान या माकडांच्या हल्ल्यात लहान मुलं व अनेक महिला आतापर्यंत जखमी झाल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा इस्लापूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय.
भीतीचे वातावरण...
किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात गेल्या काही दिवसांपासून वानरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अनेकदा हे वानर टोळीने येऊन गावकऱ्यांवर हल्ला करतात. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तर हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराबाहेर निघण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Mumbai Crime : मुंबईतील एका कॉल सेंटरवर छापा, गुन्हे शाखेकडून 17 महिलांची सुटका, मालकाला अटक