Mumbai Crime News : मुंबई क्राईम ब्रँचने (Crime Branch) मोठी कारवाई केली असून एका कॉल सेंटरचा (Call Center) पर्दाफाश केला आहे. येथून गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने तब्बल 17 महिलांची सुटका केली आहे, तसेच कॉल सेंटरच्या मालकाला अटक केलीय. 


 







महिलांकडून ऑनलाइन आक्षेपार्ह काम 


मिळालेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमध्ये महिलांकडून ऑनलाइन अश्लील काम करून घेतले जात असे. फोन कॉल्सवरून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून हे काम महिलांकडून करून घेतले जात असे. आरोपीने एक अ‍ॅप्लिकेशन तयार केले होते, ज्याद्वारे तो ग्राहकांना त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलांशी जोडायचा आणि त्यानंतर कॉलरच्या मागणीनुसार फोन कॉलवर किंवा व्हिडीओवरून हे काम केले जात असे.


अशाप्रकारे ग्राहकांकडून शुल्क आकारले जात असे


सुत्रांच्या माहितीनुसार, या कामासाठी 270 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी तपास गुन्हे शाखा करत आहे. कॉल सेंटरमधील काही महिला आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. तसेच काहींना पैशांची अडचण असे. अशा परिस्थितीत केवळ पैशासाठी आरोपी त्यांना असे काम करायला लावत असे.


या महिन्यात आणखी एक मोठी कारवाई


या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतील छाप्यांमध्ये वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या 17 महिलांची सुटका केली होती आणि दलाल म्हणून काम करणाऱ्या नऊ जणांना अटक केली होती. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) 5 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली होती. "मानवी तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या राजू आणि साहिल नावाच्या दोन लोकांविरुद्ध एका महिलेने 4 ऑगस्ट रोजी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती," असे अधिकाऱ्याने सांगितले.