नांदेड : भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे होम ग्राउंड असलेल्या लोहा- कंधार मतदारसंघात सध्या शेतकरी नेते माजी आमदार शंकर धोंडगे यांच्या बीआरएस (Bharat Rashtra Samithi) प्रवेशाने अॅम्बेसिडर सुसाट सुटली आहे. येत्या 26 मार्चला लोह्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. त्यासाठी बीआरएसच्या नेत्यांनी जिल्हाभरात बैठकांचा सपाटा लावला आहे. नांदेडातील पहिली सभा यशस्वी झाल्यानंतर चिखलीकरांच्या बालेकिल्ल्यात बीआरएसला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


भारत राष्ट्र समितीचा देशभर विस्तार करण्याच्या दृष्टीने केसीआर यांनी नांदेडची सर्वप्रथम निवड केली आहे. सीमावर्ती भागात गेल्या अनेक महिन्यांपासून बीआरएसचे आमदार, मंत्री हे सातत्याने भेटीगाठी घेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर बीआरएसने सर्वच पक्षांतील असंतुष्टांना जवळ केले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या समाजातील मातब्बर मंडळींचाही समावेश आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीसाठी शेतकरी चेहरा म्हणून माजी आमदार शंकर धोंडगे यांचे नाव पुढे येत आहे. येत्या 26 मार्चला लोहा येथे मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेत धोंडगे हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर धोंडगे हे शक्तिप्रदर्शनही करतील. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोहा-कंधार मतदारसंघात सभेच्या प्रचारासाठी वाहनांनी धुरळा उडवून दिला आहे. 


गावोगावी शंकर धोंडगे हे स्वत: बैठका घेत आहेत. केसीआरच्या योजना शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहेत, याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे खासदार चिखलीकरांची धाकधूक वाढली आहे. कारण गेल्या अनेक वर्षांत कंधार-लोहा मतदारसंघावर चिखलीकरांचे वर्चस्व आहे. चिखलीकर यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी असली, तरी त्यांचे लक्ष मात्र याच मतदारसंघावर असते. तसेच त्यांची मुलगी अन् मुलगा हे दोघेही याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यात गेले चार वर्षे राजकारणापासून अलिप्त असलेल्या धोंगडेला बीआरएसच्या अॅम्बेसिडरमुळे बूस्टर डोस मिळाला आहे, तर दुसरीकडे धोंडगेंना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी राज्यातील आपली दुसरी सभा थेट लोहा येथेच ठेवली आहे. या सभेत जिल्ह्यातील अनेक मातब्बर मंडळी अॅम्बेसिडरची सवारी करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती हाती आली आहे. 


दाजी- मेहुण्यात कलगीतुरा अन् 'बीआरएस'च्या 'एन्ट्री'ने रंगत


खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या दोघांमध्ये विस्तवही आडवा जात नाही. शिवजयंतीच्या दिवशी व्यासपीठावरच बंधू आणि भगिनीने एकमेकांवर कडाडून हल्लाबोल केला होता. एकीकडे दाजी-मेहुण्यामध्ये वाद सुरु असताना मत- दारसंघात बीआरएसच्या एन्ट्रीमुळे दोघेही सावध झाले आहेत.