नांदेड : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी चर्चेची आणि तितकीच लोकप्रिय ठरली आहे. राज्य सरकारकडून आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे, महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारकडून दरमहा 1500 रुपये मानधन, ओवळणी मिळत असल्याने महिलांना समाधान वाटते. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून या योजनेच्या निमित्ताने कार्यक्रम घेऊन महिला भगिनींना आकर्षित केलं जात आहे. कुठे महिलांसाठी विविध वस्तूंचे वाटप केले जाते, तर कुठे साड्यावाटप होत आहे. कुठे स्वत: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भेट देत आहेत. नांदेड जिल्ह्यात लाडक्या बहिणीशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. येथील साडी वाटप कार्यक्रमात महिलांची साड्या घेण्यासाठी झुंबड उडाल्याने साड्या वाटपा ऐवजी साड्या लुटल्याचंच पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यात भाजपच्यावतीने आयोजित कार्यक्रमात चांगलाच फज्जा उडाला. 


विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षात श्रेयवादाची चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचे श्रेय  घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांना टस्सल देत लढताना दिसत आहेत. नांदेडच्या तामसा येथे आज लाडकी बहीण योजना "लाडक्या बहिणींचा देवा भाऊ" या उपक्रमा अंतर्गत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दोन हजार साड्या वाटप करण्याचे नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते. परंतु,  ऐनवेळी कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त झाल्याने साडी घेण्यासाठी महिलांची एकच झुंबल उडाली. नियोजनानुसार आयोजकांकडे साड्यांची संख्या कमी पडल्नेया याठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, साड्या वाटपापूर्वीच हा कार्यक्रम आयोजकांना बंद करावा लागला. यावेळी, अनेक महिला साड्या न घेताच वापस निघून गेल्या. सकाळपासून साड्या घेण्यासाठी महिला तामसा येथे हजर झाल्या होत्या. परंतु साड्या न मिळाल्याने लाडक्या बहि‍णींचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. 


ज्या महिलांना साड्या मिळाल्या नाहीत, त्या महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही आता साड्या घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जायचे का, असा सवालही या महिलांनी उपस्थित केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून साड्या घेण्यासाठी महिलांची उडालेली झुंबड पाहायला मिळत आहे. तसेच, काही पुरुषही साड्या घेून जाताना दिसून येतात.