नांदेड : शिखांच्या पाच तख्तांपैकी एक तख्त असलेल्या नांदेड येथील संचखड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंह वाधवा (वय 53 वर्षे) यांचं निधन झालं. रेल्वे अपघतात गुरविंदर सिंह वाधवा यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
गुरविंदर सिंह वाधवा हे सोमवारी (11 जुलै) रात्री राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेगाडीने मुंबईकडे रवाना झाले होते. वेगात असलेल्या या गाडीतून ते अचानक बाहेर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी प्राण सोडले.
ही गाडी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोडी स्थानकावरुन गाडी पुढे गेल्यावर रेल्वे स्थानकातील कर्मचार्यांना जखमी अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली. त्यांची तपासणी केली असता त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती संभाजीनगरच्या रेल्वे पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर हा मृतदेह गुरविंदर सिंह वाधवा यांचा असल्याचं स्पष्ट झालं.
गुरविंदर सिंह वाधवा हे राज्यराणी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित कक्षातून प्रवास करत होते. त्यांची बॅग आणि मोबाईल तसाच रेल्वेत पुढे गेला. कल्याण रेल्वे स्थानकावर बॅग आणि मोबाईल रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करुन कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दरम्यान गुरविंदर सिंह वाधवा यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या अनेक पदांवर काम केलं होतं. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एका मुलगा असा परिवार आहे.
महाराष्ट्रातील नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या गुरुद्वाराला 'सचखंड' म्हणतात. महाराजा रणजित सिंह यांच्या विनंतीवरुन 1832 ते 1837 दरम्यान हा गुरुद्वारा बांधण्यात आला होता. याच ठिकाणी 1708 मध्ये शिखांचे दहावे आणि अखेरचे गुरु गोविंद सिंह यांनी त्यांचा प्रिय घोडा दिलबागसह अखेरचा श्वास घेतला. सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वाराने 25 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला होता.