Nanded Rain : राज्यात (Maharashtra Rain) गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे.  गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसतोय. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी ह्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आसना नदी परिसरातील वरील भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे नांदेड शहरास जोडणारे प्रमुख राष्ट्रीय  महामार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग, नांदेड -वसमत राज्य महामार्ग,नांदेड -पूर्णा राष्ट्रीय महामार्ग, किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 


नांदेड वाघाळा महापालिकेचे पितळ उघडे 


दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी होऊन रस्त्यांना तळ्याचे रूप आले आहे. दरम्यान नांदेड महापालिकेने मान्सून पूर्व नाले सफाई न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर  गुडघाभर पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा उडाले आहेत. पहिल्याच पावसात नाले सफाई अभावी शहराची अशी गटार गंगा झाल्याने नांदेड वाघाळा महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. 


नांदेड जिल्ह्याची तहान भागवणारा एकमेव प्रकल्प दमदार पावसामुळे 80 टक्के भरला आहे. तर जिल्ह्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून जिल्ह्यात आता पर्यंत जवळपास 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे किनवट, हिमायतनगर, हदगाव, तामसा, मालेगाव,अर्धापुर,भोकर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या पुलावरून पाणी जाऊन ते वाहून गेल्याने या  महामार्गावरील वाहतूकीचा मात्र खोळंबा झालाय. 


चिखली, पिंपळगाव, कोंढा, निळा, एकदरा,आलेगाव,देगाव, कासारखेडा, गणपूर, मुदखेड यासह अनेक गावांना पुरामुळे वेढा पडला आहे. तर मुदखेड, नांदेड, अर्धापुर ,उमरी, मुखेड, बिलोली, हदगाव या शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स


Maharashtra Dam Update : पावसाचा जोर; धरणं ओसंडली! पाणीसाठ्यात भरपूर वाढ, जाणून राज्यातील धरणांची स्थिती