नांदेड : भाजपमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजी होतील. पक्षश्रेष्ठीना सर्व अधिकार आहेत. पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा असेल तर  तो म्हणजे देवेंद्रजी असतील असं वक्तव्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. येत्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागेल आणि महायुतीचा विजय होईल असंही ते म्हणाले.गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. 


आम्ही महायुतीकडून निवडणूक लढवत आहोत सगळे आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आमचा मुख्यमंत्री होईल असं कोणी बोलू नये तो निर्णय महायुतीचा असेल असंही गिरीश महाजन म्हणाले.  


नांदेडचे माजी खासदार चिखलीकर यांच्या गणरायाचे दर्शन गिरीश महाजन यांनी घेतलं. त्यावेळी भाजपचे खासदार अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. तब्बल 10 वर्षानंतर अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या घरी उपस्थिती लावली. हा दुग्ध शर्करा योग असल्याची प्रतिक्रिया यावर गिरीश महाजन यांनी दिली आहे.


गेल्या 10 वर्षापासून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर व अशोकराव चव्हाण यांच्यात राजकीय वैर होते. या दोघांमध्ये नमस्कार, राम-रामही होत नव्हतं. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चिखलीकर आणि चव्हाण एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. आता गिरीश महाजन यांच्यासमवेत अशोकराव चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी हजेरी लावली होती.


खडसेंचं काही राहिलं नाही


एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी दूध डेअरीमध्येही निवडून आल्या नाहीत. आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण हे 150 किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उभे राहिले.  त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खडसे वहिनीचा पराभव केला. त्या दूध डेअरीवर चेअरमन होत्या. जिल्हा बँकेवर त्यांचं काही राहिलं नाही. विधानसभेला कन्यापण त्यांच्या पडल्या. पक्ष हा पक्ष आहे. कोणी येणं जाणं चालू राहील. ज्यांना आजमवायचं आहे त्यांनी आजमावावं.


मराठा आरक्षणावर सरकार नियमबाह्य काही करणार नाही


मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, मला वाटतं जे नियमात आहे तेच सरकार करू शकतं. नियमबाह्य काहीही करू शकत नाही आणि कोर्टही त्याला मान्यता देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे.