नांदेड : राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात जागेची खरेदी-विक्री करण्यासाठी निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असते. जागेची खरेदी विक्री हा मोठा आणि तितकाच गंभीर विषय असल्याने या विभागावर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील करडी नजर असते. मात्र, तरीही या विभागात सातत्याने गैरप्रकार होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळते. येथील कार्यालयात एजंटगिरी फोफोवल्याचं दिसून येतं, तर या एजंटगिरीला निबंधक महोदयांचेच पाठबळ असल्याचही समोर आलं आहे. आता, नांदेड (nanded) जिल्ह्याच्या हदगाव येथील निबंधकांनी गैरमार्गाचा वापर करुन तब्बल 190 पेक्षा जास्त कागदपत्रांची नोंदणी चुकीच्या व गैरप्रकाराने केल्याचं समोर आलं. त्यानंतर, नांदेडच्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Rahul kardile) यांनी दणका देत निबंधकांचे तत्काळ निलंबन (Suspend) केले आहे. आपल्या प्रामाणिक अन् तत्पर कामकाजाबद्दल कर्डिले यांचा प्रशासनात वेगळाच दबदबा आहे. 

Continues below advertisement

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा अंतर्गत कोणत्याही तालुका रजिस्ट्री कार्यालयात कोणत्याही तालुक्याची खरेदी-विक्री रजिस्ट्री करण्याची मुभा दिली आहे. शासनाच्या याच योजनेचा गैरफायदा घेऊन नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात महिन्याभरात तब्बल 1200 रजिस्ट्री नोंदणी करण्यात आल्या. यातील 90% रजिस्ट्री हदगाव तालुक्याच्या बाहेरील आहेत. या रजिस्ट्री करताना कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याचे तपासात उघड झाले. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांच्या अहवालावरून हदगाव दुय्यम निबंधक सेवलीकर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. 

हदगाव दुय्यम निबंधक संदर्भात सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानंतर, मी सहनिबंधक यांच्या नेतृत्वात एका पथकाने 400 पेक्षा जास्त कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये, 190 पेक्षा जास्त कागदपत्रांमध्ये गैरप्रकार, व्यवहार झाल्याचं समोर आल्याने तेथील निबंधकांवर कारवाई करण्यात आली आहे. निबंधक सेवलीकर यांनी अनेक रजिस्ट्री गैरप्रकार करून केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. 

Continues below advertisement

कोण आहेत राहुल कर्डिले?

राहुल कर्डिले हे कर्तव्यदक्ष व सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारे अधिकारी असून गैरप्रकार खपवून घेत नसल्याने त्यांची प्रशासनात वेगळी ओळख आहे. विशेष म्हणजे यापूर्वी केवळ महिनाभरात तीन वेळा त्यांची बदली झाली होती. राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे. त्याच ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं. तर पार्थडीमधील करंजी या गावात त्यांचे माध्यमिक शिक्षण झालं. अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. राहुल कर्डिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली. त्या दरम्यान त्यांनी यूपीएससीच्या तीन मुलाखती दिल्या होत्या. पण त्यामध्ये अपयश आलं. मात्र, चौथ्या प्रयत्नात ते देशात 422 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली.  राहुल कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यादेखील उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत.

हेही वाचा

'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष रेल्वेचा पहिला मुक्काम रायगडावर; कसा असेल रूट, किती दिवसांची यात्रा?