नांदेड : शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणे सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याची टीका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी संभाजीराजे यांनी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान झाले आहे. यामुळे मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भात (Vidarbha) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावरून संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
कृषिमंत्र्यांनी तर इथे यायलाच पाहिजे
आज छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील हदगाव तालुक्यातील उंचाडा, मारलेगाव आणि धानोरा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तिथे पंचनामे करण्याची गरज नाही, कृषिमंत्री म्हणाले. पण मुख्यमंत्री म्हणाले की, पंचनामे करावे लागतील. त्यानंतरच मदत जाहीर होईल, याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, त्यांनी इथे येऊन बघावं. मी शेतात जाऊन पाहणी केली. मी गाडीतून पाहणी केलेली नाही. बाकी आमदार, खासदारांना इथे यायला वेळ नाही का? कृषिमंत्र्यांनी तर इथे यायलाच पाहिजे ना. तुम्ही कृषिमंत्री आहात, अशी टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर केली.
कृषिमंत्र्यांना हे शोभते का?
ते पुढे म्हणाले की, हा विषय इतका नाजूक बनला आहे की, अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी इथे येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला हवेत. नुकसानीचे पंचनामे व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला वेदना झाल्या. कृषिमंत्री इकडे यायचे सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे बरोबर आहे का? हे महाराष्ट्राला शोभते का? कृषिमंत्र्यांना हे शोभते का? जरा इकडे येऊन बघा परिस्थिती काय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका
काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर केल्यावर सर्वांना जाग आली. कृषी मंत्री कोठे होते? या राज्याला कृषीमंत्री आहे की नाही? आदित्य ठाकरे येणार आहे हे कळल्यावर राज्याचे कृषीमंत्री गेले ते गाडीतून उतरले सुद्धा नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाय देखील जमिनीला लावला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली होती.
आणखी वाचा
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?