नांदेड : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात आपल्या प्रलंबित मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या गुत्तेदाराला मध्यरात्री उपोषणस्थळीच   सहकुटुंब जाळण्याचा प्रयत्न  करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्ते गुत्तेदार राजु हुलगुंडे यांनी हा आरोप केला आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयासमोरील हा खळबळजनक प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर (Nanded News) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास सुरू केला आहे. मात्र एकंदरीत पाहता उपोषणकर्ते गुत्तेदाराला उपोषणस्थळी सहकुटुंब जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


ताडकळस ते पालम रोड धानोरा काळे या साडे आठ किलोमीटर बीबीएम रोडचे गुणवत्ते प्रमाणे काम करून बिले रिकाॅर्ड करून देण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते गुत्तेदार राजु हुलगुंडे यांनी सन 2021 पासून आझाद मैदान मुंबई ते मुख्य अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग बांधकाम भवन स्नेह नगर नांदेडसमोर विविध उपोषणे केलेत.  तसेच तीन वेळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना आदेश दिले. तसेच सदरील या मागणीसाठी सन 2016 पासुन पाठपुरावा करत असल्याचेही गुत्तेदार राजु हुलगुंडे यांचे म्हणणे आहे. तरी सुद्धा थकीत बील मिळाले नसल्यामुळे दि 30 डिसेंबर 202 पासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय नांदेड समोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले असल्याचे हुलगुंडे म्हणाले. 


यापुर्वी सुद्धा आम्हाला उपोषणस्थळी मारहाण- राजु हुलगुंडे 


दरम्यान, काल मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास  उपोषणस्थळी उपोषणकर्ते गुत्तेदार हुलगुंडे यांना सहकुटुंब जाळुन मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे हुलगुंडे यांनी आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान उपोषणस्थळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली. तसेच यापुर्वी सुद्धा आम्हाला उपोषणस्थळी मारहाण करण्यात आल्याचे हुलगुंडे यांनी म्हटले आहे. हुलगुंडे यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर सकाळी सव्वानऊ वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक तांदळे हे करत आहेत. एकंदरीत पाहता उपोषणकर्ते गुत्तेदाराला उपोषणस्थळी सहकुटुंब जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


हे ही वाचा