Nagpur Crime News : क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरातील (Nagpur Police) रामबाग येथे आणखी एक अक्कू यादव प्रकरण होण्याच्या मार्गावर असल्याचे वस्तीतील संतप्त महिलांमुळे दिसून येत आहे. गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या रामबाग वस्तीतील महिलांनी कायदा हातात घेऊन गाव गुंडांचा नायनाट आम्हीच करु असा इशारा पोलिसांना दिला आहे.

Continues below advertisement

ग्रेटनाग रोडवरील रामबाग वस्तीमध्ये मुली आणि महिलांची छेड काढणे, कोणाच्याही हातातून पैसे लुटणे, हातात चाकू घेऊन रात्री सात वाजताच सगळ्यांना घराच्या आत राहण्यास मजबूर करत अघोषित संचार बंदी लावणे, घराबाहेर ठेवलेल्या दुचाकी फोडणे, परिसरातील दुकानातून देन (हफ्ते) वसूल करणे, वस्तीत लहान मुलांना नशेखोरीला लावून त्यांचा आयुष्य बरबाद करणे, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे हे नित्याचे झाले आहे.

पोलीस स्थानकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर गुंडाची दहशत

या गुंडाच्या त्रासला वैतागलेल्या महिलांनी आता स्वतःच कायदा हातात घेण्याचे जाहीर करत ऋषिकेश वानखेडे नावाचा गावगुंड आणि त्याच्या टोळीचा बंदोबस्त लवकर करा, अन्यथा आम्हालाच कायदा हातात घेऊन त्याचा नायनाट करावा लागेल असा इशारा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या वस्तीतील महिलांनी 'एबीपी माझा' शी बोलताना आपली व्यथा व्यक्त केली आहे, ती वस्ती स्थानिक इमामवाडा पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही वानखेडे आणि त्याच्या टोळीविरोधात अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केल्या आहेत. मात्र थातूरमातूर कारवाई होऊन हे गाव गुंड पुन्हा सुटून येतात आणि तक्रार करणाऱ्यांवर सूड घेतात. त्यामुळे आता पोलीस तक्रार न करता स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे या मानसिकतेत वस्तीतील नागरिक पोहोचले आहेत. जर संध्याकाळी आमची मुलं घराबाहेर खेळू शकत नसतील, आम्ही सात वाजल्यानंतर बाहेर फिरु शकत नसू, आमच्या घरी पाहुणे येऊ शकत नसतील. तर आम्हालाच वस्तीतील वातावरण सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यासाठी कायदा हातात घेऊन गुंडांचा नायनाट करावा लागेल असं मत अनेक महिलांनी व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

अल्पवयीन असल्याचा फायदा

वस्तीत धिंगाणा घालून दहशत माजवणारा मुख्य सूत्रधार ऋषिकेश वानखेडे हा अल्पवयीन असल्याने अनेकवेळा कायद्याच्या कचाट्यातून सुटला आहे. मात्र नोव्हेंबर 2022मध्ये त्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली असून आता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार गेल्या आठवड्यात संतापलेल्या महिलांनी पोलीस स्थानकाचा घेराव घातला होता. तसेच पोलीस प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ असेल तर गुंडाला आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याचा बंदोबस्त करु असा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर येऊन त्यांनी परिसरात सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान शस्त्र पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. तसेच सध्या या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र या गावगुंडाचे अल्पवयीन साथीदार अद्याप मोकाट असून सध्या अंडरग्राऊंड असल्याची माहिती आहे.

साक्षीदार होतात फितूर

नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही या गुंडाला अनेकवेळा अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनही या गुंडावर कठोर कारवाई करण्याच्या मानसिकतेत आहे. माध्यमांशी बोलताला महिला एकत्र येतात. मात्र कोर्टात त्याच्याविरोधात बोलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे पुराव्याअभावी गुंड सुटून परत धिंगाणा घालतो.

ही बातमी देखील वाचा...

जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात नागपूर पोलिस 'अॅक्शन मोड'वर