Nagpur Police News : नागपूर शहरातील विविध सिग्नलवर तसेच घरात कुठलेही शुभप्रसंग असल्यास घरात जबरदस्ती शिरुन पैशाची मागणी करणाऱ्या तसेच पैसे दिले नाही तर धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथींयांविरोधात नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. नागपूर पोलिस (Nagpur Police) आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून 17 फेब्रुवारीपर्यंत शहरात पैशांची मागणी करणारे तसेच पैसे देण्यासाठी नकार देणाऱ्यांकडे धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात कलम 144 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात कुठेही लग्न,बारसे वा इतर कार्यक्रम असल्यास तिथे तृतीयपंथींयांच्या टोळ्या घरात शिरुन पैशाची मागणी करतात. अशावेळी त्यांना नकार दिल्यास त्यांच्याकडून अश्लिल शिविगाळ आणि धमक्या देण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्याबाबत अनेकदा तक्रारीही आल्यात. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आता चौकांसह कुठल्याही समारंभात जबरदस्तीने पैसे मागितल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहे.
नाईलाजाने अनेकजण देतात पैसे
शहरातील निवासस्थान, व्यवसायिक प्रतिष्ठान व वाहतूक सिग्नलवर येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वार असो वा कुठलाही लग्नसोहळा, बारसे, उत्सव, स्नेहसम्मेलन, धार्मिक कार्यकम किंवा मृत्यू प्रसंगी तृतीयपंथियांची टोळी घरात शिरते. या टोळींकडून घरातील व्यक्तींना पैशाची मागणी केली जाते. अनेकदा अवास्तव पैसे मागून घरच्यांना त्रासही देण्यात येतो. अनेकदा त्यांना नकार देताच तृतीयपंथियांच्या टोळीकडून अश्लिल शिवीगाळ आणि दहशत पसरविण्याचे काम केल्या जाते. तसेच अश्लिल वर्तनही करण्यात येते. त्यामुळे नाईलाजाने अनेकजण पैसे देत, त्यांच्याकडून पिच्छा सोडविताना दिसून येतात.
शहरातील विविध चौकात वसूली
विशेष म्हणजे, अनेकदा जबरीने तृतीतपंथियांकडून पैशासाठी तगादा लावण्यात येत असल्याचे दिसते. चौकात अगदी नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्याबाबत सातत्याने पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकंदरीत तृतीयपंथियांची शहरात दहशत निर्माण झाली असून त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने पोलिस आयुक्तांनी आदेश काढून अशा तृतीतपंथियांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. हे आदेश 17 फेब्रुवारीपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत.
असे आहेत नागपूर पोलिस आयुक्तांचे आदेश...
- नागपूर शहरात तृतीयपंथियांविरोधात आजपासून कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
- या अंतर्गत टोळी वा एकटे तृतीयपंथी कुठल्याही कार्यक्रमात पैशाची मागणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
- ट्रॅफिक जंक्शन,चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक, प्रवाशांकडून पैसे मागण्यास मनाई करण्यात आली आहे.
- आयोजकाने आमंत्रित केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- आदेशाचे उल्लंघन केल्यास नागपूर पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ही बातमी देखील वाचा...